पुतळ्याच्या नावाखाली वर्गणीचा गोंधळ ! तीन वर्षांनंतरही पुतळा नाही; लाखोंच्या वर्गणीचा हिशेब गेला कुठे ?
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
माजी मंत्री व लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या जिवंतपणी पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या उदात्त नावाखाली महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतीने त्यांच्या काही सहकारी मित्रांना सोबत घेऊन या उपक्रमाच्या नावाखाली भुसार व्यापारी,स्थानिक पुढारी तसेच बंजारा समाजातील बांधवांकडून हजारो-लाखो रुपयांची वर्गणी वसूल केल्याची विश्वसनीय माहिती आहे.
या कथित वर्गणी संकलनाला जवळपास तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला असतानाही आजतागायत पुतळ्याचे काम सुरू झालेले नाही.पुतळा तयार करण्याची ऑर्डर नेमकी दिली तरी कुठे ? पुतळा उभारणार तरी कधी ? असे थेट प्रश्न आता वर्गणीदारांकडून उपस्थित केले जात आहे.दरम्यान, काळी दौलत सर्कल अंतर्गत कातरवाडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडे तब्बल ५० हजार रुपयांची वर्गणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, दस्तुरखुद्द त्या व्यापाऱ्यानेच भ्रमणध्वनीवरून लोकप्रिय न्यूज पोर्टल ‘लोकवेध’शी संवाद साधत पन्नास हजार रुपये वर्गणी दिल्याचा खुलासा केला,त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
लोकनेत्याच्या नावाचा वापर करून पुतळा उभारणीच्या नावाखाली वर्गणी वसूल करून त्याचा कुठलाही हिशेब न देणे, हा प्रकार केवळ नैतिकतेलाच नव्हे तर सार्वजनिक विश्वासालाही तडा देणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.त्यामुळे वर्गणीदारांनी आता थेट वर्गणीचे ऑडिट,जमा रकमेचा तपशील,खर्चाचा हिशेब व जबाबदारी निश्चित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
तीन वर्षांनंतरही पुतळा नाही,पण वर्गणी मात्र गोळा झाली.मग पैसा नेमका गेला कुठे ? ही वर्गणी लोकसेवेकरिता होती की काहींच्या सोयीसाठी ? या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी महागाव तालुक्यातील नागरिक व वर्गणीदारांकडून जोर धरू लागली आहे.लोकनेत्याच्या नावावर झालेल्या या कथित वर्गणी घोटाळ्यावर प्रशासन आणि संबंधित व्यक्ती काय भूमिका घेतात.याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
——————————————————————————-
मी, या प्रकरणात मागील आमसभेत प्रश्न उपस्थित केला होता.परंतु माझ्या प्रश्नावर संबंधितांनी काहीच उत्तर दिले नाहीत.मला सुद्धा पुतळा उभारणीसाठी मोठी रक्कम मागण्यात आली होती.सबंधित ,माजी सभापती आणि त्यांच्या सहकारी काही बड्या नेत्यांनी वर्गणी गोळा केली.आता त्यांनी एक तर पुतळा उभारावा किंवा वसुल करण्यात आलेल्या त्या रक्कमेचा हिशोब वर्गणीदारांना देऊन त्यांचा विश्वास संपादन करावा.
दौलतराव नाईक,माजी जी प.सदस्य. पेढी.तालुका महागाव.
