अनुदान विचारल्यावर शेतकऱ्यावर बुटाने हल्ला! मंगरूळपीर तालुका कृषी अधिकाऱ्याच्या अमानुष कृत्याने संताप

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

वाशिम:- 

 

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात शेतकरी विरोधी प्रशासनाचा धक्कादायक चेहरा समोर आला असून, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यासोबतच शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी शिवारात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबाग लागवडीचे अनुदान व मजुरी गेल्या चार महिन्यांपासून रखडलेली आहे. याबाबत शेतकरी ऋषिकेश पवार यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, अधिकाऱ्यांनी संतापाच्या भरात शेतकऱ्यावर अमानुष हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने राज्यभर शेतकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेचा तीव्र निषेध करत अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संघटनेने दिलेल्या प्रेस नोटमध्ये संबंधित कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनासह विभागीय चौकशी सुरू करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पीडित शेतकऱ्याला त्वरित संरक्षण देऊन रखडलेले अनुदान व मजुरी तात्काळ अदा करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड, राष्ट्रीय महासचिव नामा बंजारा आणि मीडिया प्रमुख धर्मेंद्र जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणात तात्काळ न्याय मिळाला नाही, तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच शेतकऱ्यांवर अत्याचार होणे ही अत्यंत निंदनीय बाब असून, या प्रकरणात शासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या