अवैध धंद्यांना मोकळे रान ! नागचौकात तलवार–चाकूने सफाई कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; दगडफेकीत नागरिक जखमी, वाढत्या गुन्हेगारीने उमरखेडची शांतता व सुव्यवस्था धोक्यात

लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

उमरखेड :

शहर व तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांचे दुष्परिणाम आता थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरातील नागचौक परिसरात मंगळवारी (दि. १४) सायंकाळी सफाई कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांवर तलवार व चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर काही वेळातच परिसरात दगडफेक झाली असून, नागचौक व लगतच्या भागात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था गंभीररीत्या बिघडत असताना, स्थानिक पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणी उमरखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून,तिघा आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तक्रारदार साहील तुलसीराम पटोणे (वय २१, रा. नागचौक) हे गेल्या सहा वर्षांपासून नगर परिषद उमरखेड येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. १३ जानेवारी रोजी पहाटे नागचौक परिसरातून एक मोटारसायकल चोरीस गेली होती. ही दुचाकी दुसऱ्या दिवशी करोडी रोडवर मिळून आली. सदर मोटारसायकल शेख शाहरुख (रा. रहीमनगर) याने नेल्याचा संशय व्यक्त होत असल्याची माहिती मिळाल्यानंतरच हा वाद उफाळून आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

१४ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता साहील पटोणे, त्यांचा भाऊ कुणाल व भाचा कृष्णा डेंडवाल नागचौक परिसरात उभे असताना शेख शाहरुख, अक्कु व अस्लम (सर्व रा. इदगाह, रहीमनगर) तेथे आले. तक्रारीनुसार, शेख शाहरुखच्या हातात धारदार तलवार तर अक्कुच्या हातात मोठा चाकू होता. आरोपींनी जातीय शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवला. शेख शाहरुखने साहील यांच्या डोक्यावर तलवारीचा वार करण्याचा प्रयत्न केला, तर अक्कुने कुणाल यांच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत तिघांनी जवळच्या गल्लीकडे धाव घेत जीव वाचवला.

हल्ल्यानंतर अवघ्या काही वेळातच ६ ते ७ इसमांनी नागचौक परिसरात दगडफेक करत पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दगडफेकीत रस्त्यावरील काही निष्पाप नागरिक जखमी झाले असून, एका जखमी इसमाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. भर वस्तीतील या हिंसाचारामुळे नागचौकसह परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.

दरम्यान, उमरखेड शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढत असून, चिंचोली परिसरातील महाजुगार, शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेला वरळी-मटका व अन्य गैरकृत्ये खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अशा अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष खतपाणी घालणाऱ्या संबंधित विभागांवर थेट कारवाई कधी होणार,असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था ढासळत चालली असताना, ती आटोक्यात आणण्यात स्थानिक पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे या दैनंदिन हिंसक घटनांवरून स्पष्ट होत आहे.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शंकर पांचाळ करीत आहेत. आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी व आयुक्त अवैध धंदे आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी थेट, कठोर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या