एकनाथ नगर प्लॉट विक्रीला न्यायालयाचा ब्रेक ! महागाव न्यायालयाचा मनाई हुकूम; ग्राहक संभ्रमात, अवैध विक्रीवर चपराक

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
महागाव शहरातील फुलसावंगी रोडवर, महागाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळ विकसित करण्यात आलेल्या एकनाथ नगर (एकनाथ नगरी) ले-आऊटमधील प्लॉट विक्रीस तूर्तास न्यायालयाने मनाई हुकूम जारी केला आहे. या आदेशानुसार प्लॉट क्रमांक १, ४, ५, ६, ७, ८ व ९ यांच्या खरेदी-विक्रीवर मज्जाव करण्यात आल्याने संबंधित विक्रेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, उल्हास अहाळे विरुद्ध आदित्य एकनाथ चिन्नावर या प्रकरणात २ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी झाली. वादी गैरहजर तर त्यांचे विधिज्ञ उपस्थित होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अर्ज क्रमांक ५ खाली न्यायालयाने अंशतः मंजुरीचा आदेश पारित केला आहे. या प्रकरणात सरकारी वकिलांनी बाजू मांडत सखोल तपासणीअंती स्थिती स्पष्ट केल्याचेही समजते.
दरम्यान, या मनाई आदेशामुळे आधीच प्लॉट खरेदी केलेले किंवा खरेदीच्या प्रक्रियेत असलेले ग्राहक संभ्रमात पडले असून, काहींना फसवणूक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. न्यायालयीन आदेश लागू असताना प्लॉट विक्री सुरू असल्यास ती अवैध ठरू शकते, असा इशाराही कायदेपंडितांनी दिला आहे.
एकनाथ नगरमधील प्लॉट व्यवहारांबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील पावले उचलावीत, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.
