दिव्यांग प्रमाणपत्राच्या नावाखाली १.३० लाखांची खंडणी,जिवे मारण्याची धमकी उमरखेड पोलिसांत गुन्हा दाखल
⚫लोकवेध न्युज नेटवर्क
उमरखेड :-
येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले सहायक महसूल अधिकारी निरंजन धनसिंग पवार (वय ४१, रा. मोतीनगर पुसद) यांना दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करण्याची धमकी देत १ लाख ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात अमजत खान पठाण (रा. जांब बाजार, पुसद) व एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निरंजन पवार हे शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून शासनाच्या नियमानुसार त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २७ नोव्हेंबर २०२५ रोजी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून दिव्यांगांचे ऑनलाईन UAID प्रमाणपत्र प्राप्त केले होते. त्यावेळी अमजत खान पठाण याने डॉक्टर ओळखीचा असल्याचे सांगून प्रमाणपत्र लवकर करून देण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला.
दरम्यान दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय उमरखेड येथे अमजत खान पठाण एका महिलेसह येऊन फिर्यादीकडे १.३० लाख रुपये मागत पैसे न दिल्यास दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच फोन व व्हॉट्सअॅपद्वारे सातत्याने अश्लील शिवीगाळ व धमक्या दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या सततच्या धमक्यांमुळे आपल्याला जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगत फिर्यादीने उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंदन जाधव हे करत आहेत.
