महागगावाच्या एसबीआय शाखेत भरदिवसा चोरी, ग्राहकाच्या हॅन्डबॅगमधून ३७ हजार लंपास; सीसीटीव्हीत चोरटा कैद

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव :- 

 

महागाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत भरदिवसा ग्राहकाच्या हॅन्डबॅगमधून ३७ हजार रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बँक परिसरात एकच खळबळ उडाली असून, महागाव पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यातील ईटावा वार्ड येथे राहणारे संजय रामराव मस्के (वय ५५) हे पशुसंवर्धन विभागात कार्यरत असून, त्यांचे पगारी खाते महागाव येथील एसबीआय शाखेत आहे.नेहमीप्रमाणे पगार काढण्यासाठी ते बँकेत आले होते. कॅश काउंटर क्रमांक १ वरून त्यांनी ३७ हजार रुपये काढून ते मोजल्यानंतर प्लास्टिक पिशवीत ठेवले व ती काळ्या रंगाच्या हॅन्डबॅगमध्ये ठेवून बॅगची चेन बंद केली.

बँकेतील व्यवहार पूर्ण करून बाहेर आल्यानंतर मोटारसायकलजवळ उभे राहून मित्राला मोबाईलवर कॉल करण्यासाठी त्यांनी हॅन्डबॅग खाली ठेवली.काही क्षणांतच कॉल संपवून बॅगकडे पाहिले असता चेन उघडी असल्याचे लक्षात आले. बॅग तपासली असता त्यातील ३७ हजार रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती तत्काळ बँक व्यवस्थापनाला देण्यात आली.त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एक अज्ञात भामटा हॅन्डबॅगमधून रक्कम चोरून नेताना स्पष्टपणे कैद झाल्याचे दिसून आले.या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महागाव पोलीस ठाण्याचे टाऊन इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन येडतकर व टाऊन बिट इन्चार्ज स्वप्निल रायवाडे करीत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, बँक परिसरात वर्दळीच्या ठिकाणी रोख रक्कम हाताळताना नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे,असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या