कचरा जाळून पुसद गुदमरवले! इंदिरानगर डम्पिंग यार्डमुळे नागरिक आजारी; प्रशासन ढिम्म,मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार

⚫ लोकवेध न्यूज 

पुसद :- 

पुसद शहरातील इंदिरानगर कचरा डम्पिंग यार्डमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कचरा उघड्यावर जाळला जात आहे.या जाळणीमुळे संपूर्ण परिसर काळ्या, विषारी धुरात बुडाला असून नागरिक अक्षरशः श्वास घेऊ शकत नाहीत. लोक त्रस्त असताना नगर प्रशासन आणि संबंधित अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत गप्प बसले आहेत.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जाळणीमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून अनेकांना दवाखान्यात धाव घ्यावी लागली आहे. डोळे जळजळणे, सतत खोकला, छातीत कळ येणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. काही भागांत विहिरीच्या पाण्याचा रंग बदलल्याचेही नागरिक सांगत आहेत. एवढे गंभीर परिणाम दिसत असतानाही प्रशासन यावर बोलायला तयार नाही.ही ,संतापजनक बाब असल्याचे नागरिक म्हणतात.

स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरू असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. कचरा व्यवस्थापन, वेगळीकरण आणि बायोमायनिंगसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना प्रत्यक्षात एकही वैज्ञानिक प्रक्रिया राबवली जात नाही. कचरा सरळ जाळून पुरावा नष्ट केला जात असल्याचा आरोप असून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत उघडपणे दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

“तीन दिवसांपासून धुराशिवाय हवा नाही. मुलांना श्वास घेता येत नाही, आबालवृद्धांना आजारी विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.प्रशासनाला आमच्या जीवाची किंमत नाही का? आम्हाला जगू द्या,अशी आर्त हाक संतप्त नागरिक देत आहेत.

कचरा जाळणे बेकायदेशीर असतानाही ते खुलेआम सुरू आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. वेळेवर कारवाई का होत नाही, दोषींवर कार्यवाही का ? केली जात नाही,असे थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

नागरिकांनी इंदिरानगर डम्पिंग यार्डवरील कचरा जाळणी तात्काळ बंद करण्याची,दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची, हवा व पाण्याची तातडीने तपासणी करून अहवाल जाहीर करण्याची आणि कचरा व्यवस्थापनासाठी आलेल्या निधीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणाची थेट तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली असून त्वरित कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन जागे होते की पुसदकरांचा संयम संपतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या