कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थेट सीसीआय केंद्रावर कापूस आणण्याचे आवाहन मंजीत कॉटन जिनिंगकडून मार्गदर्शन; पारदर्शक खरेदी प्रक्रियेवर भर

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :—
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस थेट शासनाच्या कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया या सीसीआय खरेदी केंद्रावर आणावा,असे आवाहन मंजीत कॉटन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन थेट केंद्रावर कापूस आणल्यास खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महागाव तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेली मंजीत कॉटन जिनिंग संस्था कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य देत आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम न ठेवता शेतकऱ्यांनी आपला कापूस थेट सीसीआय केंद्रावर सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात माहिती देताना मंजीत कॉटन जिनिंगचे व्यवस्थापक सुरेंद्र खेप्पर यांनी सांगितले की,शासनाने निश्चित केलेल्या सर्व नियम व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा. कागदपत्रांची पूर्तता, प्रतवारी,वजन आणि इतर तांत्रिक बाबींमध्ये योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवूनच संपूर्ण खरेदी प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलाही संभ्रम निर्माण करू नये असे आवाहनही केले.
दरम्यान, महागाव तालुक्यातील कापूस उद्योग अविरत सुरू राहावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.हा उद्योग गुंज परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आलेला आहे.त्यामुळे हा उद्योग सुरू राहिल्यास स्थानिक पातळीवर अधिक रोजगारनिर्मिती होण्यासोबतच शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळण्यास मदत होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
