अमृत पॅटर्नचा जगभर गाजावाजा; इटलीच्या तज्ञांची थेट शेतात पाहणी

लोकवेध न्यूज नेटवर्क / २८ मार्च
महागाव :
यवतमाळ जिल्ह्याची ओळख अनेक वर्षे कापूस उत्पादक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी राहिली. मात्र, आता महागाव तालुक्यातील अंबोडा गावाने ही प्रतिमा बदलण्याची दिशा दाखवली आहे. येथील प्रयोगशील शेतकरी अमृतराव देशमुख यांच्या “अमृत पॅटर्न”ने आता देशाबरोबरच परदेशातही आपला ठसा उमटवला आहे.
गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अमृतराव देशमुख यांनी आपल्या शेतात कापूस, सोयाबीन, चणा, ऊस यांसारख्या पिकांवर सातत्याने प्रयोग करत विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या शेतात कापूस एकरी सुमारे ४० क्विंटल, सोयाबीन २० क्विंटल, चणा १८ क्विंटल आणि ऊस ८५ टनपर्यंत उत्पादन घेतले जाते, जे सामान्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या शेतातील कापूस हंगाम संपल्यानंतरही भरघोस अवस्थेत आहे. त्यामुळे कपाशीचे पीक हंगामी नसून योग्य पद्धतीने घेतल्यास ते दीर्घकाळ टिकू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
देशमुख यांच्या शेताला राज्यभरातून तसेच इतर राज्यांमधून हजारो शेतकरी, अधिकारी आणि शेती तज्ञांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या उत्पादनात वाढ केली आहे. त्यामुळे त्यांची शेती ही केवळ शेती न राहता एक प्रकारची “प्रयोगशाळा” बनली आहे.
या यशस्वी प्रयोगाची दखल आता परदेशातही घेतली जात आहे. नुकतेच इटली देशातील शेती तज्ञांची एक टीम अंबोडा येथे येऊन देशमुख यांच्या कापूस प्लॉटची पाहणी करून गेली. या टीममध्ये नुरीना, फ्रान्सको, लुरो यांचा समावेश होता. त्यांनी या प्रयोगाबद्दल सविस्तर माहिती घेतली आणि देशमुख यांना इटलीला भेट देण्याचे आमंत्रण दिले.
या पाहणीवेळी स्थानिक शेतकरी बाळूपाटील दुपात्रे, सतीश ठाकरे, तसेच दिनेश देशमुख उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी शेतीतील विविध तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले.
लवकरच अमेरिकेतील कापूस संशोधक देखील या शेताला भेट देणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. एकेकाळी शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात आज सकारात्मक बदल घडवणारा हा प्रयोग उभा राहिला आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
तथापि, परदेशातील तज्ञांनी या प्रयोगाची दखल घेतली असताना राज्यातील शासकीय यंत्रणा व काही संशोधकांनी याकडे अपेक्षित लक्ष न दिल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.
