महागावात नाफेडमार्फत हरभरा-तूर खरेदीला शुभारंभ

लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ मार्च 

महागाव : – 

महागाव येथील खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर नाफेड अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार हरभरा व तूर खरेदीला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खुल्या बाजारात कमी दराने शेतीमाल विकण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या खरेदी केंद्रावर शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार हरभरा ५८७५ रुपये व तूर ८००० रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केली जाणार आहे.या खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ शुक्रवार (दि.१३ मार्च २०२६) रोजी सहकार विभागाचे कर्मचारी जे. बी.साळवे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार,संचालक हनवंतराव देशमुख, तातेराव सरदार,रावसाहेब पाटील नरवाडे,बाजार समितीचे सचिव अभिजित गुगळेसह आदी मान्यवर उपस्थित होते.शुभारंभ प्रसंगी प्रथम हरभरा घेऊन येणारे शेतकरी अमोल बाबाराव शिरगिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमावेळी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक संतोष भिसे,लिपिक संतोष देशमुख,प्रमोद जाधव,मापारी तसेच ग्रेडर महेश कामारकर,भिमराव साळवे यांच्यासह शेतकरी व हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खरेदी केंद्रावर फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच एसएमएसद्वारे बोलावून माल खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांनी आपला माल स्वच्छ करून वाळवून केंद्रावर आणावा. तसेच सातबारा उतारा,आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक असल्याचे खरेदी-विक्री संघाने कळविले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कोणत्याही व्यापाऱ्याला कमी दरात माल न विकता नाफेडच्या केंद्रावर नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा,असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक संतोष भिसे यांनी केले आहे. तसेच खुल्या बाजारात हरभरा व तूर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. हरभरा नोंदणीची अंतिम मुदत ३० मार्च तर तूर नोंदणीची अंतिम मुदत २४ मार्च असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहित कालावधीत खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष विशाल पवार यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या