बिबट्याची दहशत वाढली; संतप्त शेतकऱ्यांचा वनविभागावर मोर्चा

लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
महागाव शहरालगतच्या शेत परिसरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.वारंवार दर्शन देत हा बिबट्या कुत्रे,गुरेढोरे तसेच वन्य प्राण्यांची शिकार करत परिसरात मुक्तपणे वावरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रतीक पाटील नरवाडे यांच्या नेतृत्वात सुमारे शंभर शेतकऱ्यांसह वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन छेडले. “जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही,तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार,दोन ते तीन दिवसांपूर्वी बिबट्याने एका पाळीव कुत्र्याची शिकार करून परिसरात ठाण मांडले होते.त्यावेळी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती; मात्र त्यांच्या नजरेसमोरूनच बिबट्याने पळ काढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
काल पुन्हा बिबट्याने कुत्र्याची शिकार करून त्याला झाडावर नेल्याची घटना घडली.हा प्रकार लक्षात येताच शेतकऱ्यांनी आरडाओरड करत परिसरातील इतरांना सतर्क केले. त्यानंतर बिबट्या झाडावरून उतरून जवळच्या गोठ्यात शिरला. याबाबत वनविभागाला कळवूनही वेळेत प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे बिबट्याने तेथूनही पळ काढला.
वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच बिबट्याचा धोका वाढत असल्याचा आरोप करत “एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच कारवाई होणार का?” असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.दरम्यान,बिबट्याचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरू असून वनविभाग व पोलिस प्रशासन सतर्क झाले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप बिबट्या जेरबंद करण्यात यश आलेले नाही.
परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

