अवकाळी पावसाचा रब्बी पिकांवर घात : महागाव-पुसद-उमरखेड-दिग्रस तालुक्यात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ फेब्रुवारी
महागाव :-
काल सायंकाळी झालेल्या अवेळी वादळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, पुसद, उमरखेड व दिग्रस तालुक्यांतील अनेक शेतशिवारांना तडाखा दिला. काढणीला आलेला गहू, हरभरा तसेच संत्रा व केळी यांसारखी बागायती पिके वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः भुईसपाट झाली. त्यामुळे आधीच दुष्काळ व सततच्या नैसर्गिक संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अनेक ठिकाणी गव्हाच्या शेतात पाणी साचल्याने पीक आडवे झाले असून काढणीस अडथळा निर्माण झाला आहे. हरभऱ्याच्या शेंगा ओलाव्यामुळे काळवंडण्याची भीती व्यक्त होत आहे. तर संत्रा व केळीच्या बागांमध्ये वाऱ्याने फळगळ होऊन झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाल्याने सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली.
सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून “कधी आसमानी तर कधी सुलतानी” संकटांचा सामना करावा लागत असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शेतमाल हातात येण्याच्या उंबरठ्यावर असताना झालेल्या या नुकसानीमुळे अनेक शेतकरी हतबल झाले असून भविष्यातील शेती नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, शेतकरी नेते मनीष जाधव यांनी जिल्हा प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांनी या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली नाही, तर शेतकरी वर्ग आणखी संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आता शासनाच्या मदतीकडे आशेने पाहत आहेत.
