वीजेचा लपंडाव सुरूच; पाण्याअभावी ऊस पिकावर संकट,सवना परिसरातील बागायतदार त्रस्त
लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :
महागाव तालुक्यातील सवना,वाकोडी आणि वेणी शिवारात ऊस पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. ऊस पिकाला इतर पिकांच्या तुलनेत अधिक पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांना विहीर, बोअरवेल तसेच कॅनॉलच्या माध्यमातून सिंचन करावे लागते. यासाठी सातत्यपूर्ण व पुरेसा वीजपुरवठा अत्यंत आवश्यक असतो. मात्र सध्या वीजेच्या सतत सुरू असलेल्या ‘लपंडावा’मुळे परिसरातील बागायतदार प्रचंड त्रस्त झाले आहेत.
सवना शिवारात वीजपुरवठ्यासाठी ३३ के.व्ही. केंद्र कार्यरत असले तरी सध्या तापमानात वाढ होत असल्याने वीज केंद्रावर ओव्हरलोड निर्माण होत आहे. परिणामी दर तासाला वीजपुरवठा खंडित होत असून सिंचनाच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे ऊस पिकाला पाणी देणे कठीण होत असून पिकांवर ताण निर्माण होत असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान सवना शिवारातील काही भाग गुंज येथील केंद्राशी जोडण्यात आला असला तरी तिकडेही जवळपास अशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढल्यास पिकांची अवस्था काय होईल,याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
याबाबत शेतकरी गोविंदराव देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी केली असता गुंज ते सवना दरम्यानची लिंक लाईन आणि बॅक कॅपेसिटरचे काम अद्याप अपूर्ण असल्याने सबस्टेशनवर ओव्हरलोड येत असल्याची माहिती देण्यात आली.त्यामुळे ही अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना द्याव्यात,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान,ही कामे लवकर पूर्ण न झाल्यास पुढील हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही शेतकरी गोविंदराव देशमुख आणि इतर शेतकऱ्यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेधशी बोलताना दिला. तसेच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच लेखी निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

