महागाव पोलिसांत परस्पर फिर्याद : किरकोळ वादातून मारहाण,शिवीगाळ व विनयभंगाचा आरोप
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
महागाव तालुक्यातील पोहंडुळ गावात झालेल्या एका किरकोळ वादातून मोठा गोंधळ उडाला असून,या प्रकरणी महागाव पोलीस स्टेशन येथे एकमेकांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण आहे.
दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साधारण ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पहिल्या फिर्यादीत रेश्माबी शेख अनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांच्या लहान मुलीने आरोपींच्या घरासमोर चिप्सचा पुडा फेकला.याच कारणावरून वादाला सुरुवात झाली.आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने सर्व आरोपी एकत्र येऊन फिर्यादीच्या घरासमोर आले व त्यांच्या पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.लाकडी काठीने मारहाण केल्याचा तसेच फिर्यादीचा हात पकडून विनयभंग केल्याचा आरोपही तक्रारीत आहे.
दुसऱ्या बाजूने परवीन चिराग अरबी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,त्या सायंकाळी घरासमोरील गाईला चारापाणी देत असताना शेजाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ केली.पुढे हा वाद वाढून मारहाण झाली.त्यांच्या पतीला लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप असून,त्यांच्याशीही छेडछाड करून विनयभंग करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.तसेच जीवाने मारण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे.या,दोन्ही तक्रारींच्या आधारे महागाव पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.जमादार केशव चव्हाण तपास करत असून,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.एकाच घटनेतून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.दरम्यान,या घटनेमुळे पोहंडुळ गावात तणावापूर्ण शांतता असून,पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
