जुगार माफिया मोकाट, पोलीस प्रशासन गुडघे टेकून बसले ! करोडोंचा कट पत्ता सुरू असताना कायद्याला कुलूप; उमरखेड पोलिसांची उघड मूकसंमती

लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड:-


हदगाव येथून हकालपट्टी झाल्यानंतरही अवैध जुगाराचा कुख्यात सूत्रधार सिद्धू याने उमरखेड तालुक्यात खुलेआम हायप्रोफाईल कट पत्ता सुरू केल्याचा गंभीर आरोप संपूर्ण परिसरात खळबळ उडवून देणारा ठरत आहे. उमरखेड–हदगाव सीमेवरील चिंचोली परिसरात “एका बादशहा” या नावाने सुरू असलेला हा जुगार अड्डा दररोज करोडो रुपयांची उलाढाल करत असून, हा प्रकार म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा निर्लज्ज खून असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,हदगाव विधानसभा मतदारसंघात अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही, अशी ठाम आणि कठोर भूमिका बाबुराव कोहळीकर यांनी घेतल्यामुळेच सिद्धूला हदगावमधून पळ काढावा लागला. मात्र जिथे कायद्याचा धाक संपतो,तिथे गुन्हेगार निर्ढावतात,याचाच प्रत्यय उमरखेडमध्ये येत आहे. हदगावमधून हुसकावून लावलेला जुगार माफिया उमरखेडमध्ये मात्र निर्धास्तपणे जुगाराचे साम्राज्य उभारत आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध जुगाराकडे उमरखेड पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी,ठाणेदार आणि संपूर्ण यंत्रणा असतानाही हा कट पत्ता राजरोसपणे सुरू आहे, म्हणजेच हा प्रकार पोलिसांच्या मूकसंमतीशिवाय शक्यच नाही, अशी ठाम जनभावना आहे. पोलीस कारवाई शून्य आणि गुन्हेगारांचे मनोबल मात्र प्रचंड वाढलेले दिसत आहे.या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील युवक मोठ्या प्रमाणात जुगाराच्या आहारी जात आहेत.अनेक कुटुंबे कर्जबाजारी होत असून घरगुती वाद, आर्थिक नासधूस आणि सामाजिक अस्थिरता वाढत आहे. जुगारातून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशामुळे चोरी, फसवणूक, मारहाण यांसारख्या गुन्ह्यांना खुलेआम खतपाणी मिळत आहे, तरीही पोलिस प्रशासन शांत आहे.

या संपूर्ण प्रकरणात राजकीय मूकसंमती असल्याचीही जोरदार चर्चा असून उमरखेडचे आमदार किशनराव वानखेडे यांचे नाव चर्चेत घेतले जात आहे. राजकीय आश्रय आणि पोलिसांचे मौन यामुळेच सिद्धूसारखा गुन्हेगार इतक्या निर्भयपणे अवैध धंदा चालवत असल्याचा थेट आरोप आता नागरिक करत आहेत.
कायदा जर सामान्य माणसासाठी कडक आणि गुन्हेगारांसाठी नरम असेल, तर जनतेने न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडून करायची, असा प्रश्न उभा राहिला आहे. तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर उमरखेड तालुका जुगार माफियांचे सुरक्षित आश्रयस्थान बनेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी थेट पोलीस प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा संतप्त नागरिक देत आहेत. आता प्रश्न एकच आहे—पोलीस प्रशासन जागे होणार की गुन्हेगारांसमोर कायम नतमस्तक राहणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या