वसंत नगर पोलीस ठाणे मटक्यांचे राखणदार झाले का ? पुसद मध्ये वरळी मटक्याचा धुमाकूळ; ठाणेदारांची भूमिका थेट संशयाच्या भोवऱ्यात

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

पुसद :—

पुसद शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशन हद्दीत वरळी मटका, जुगार, फुलफकडी आणि ऑनलाइन मटका यांसारख्या अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे.कायद्याचा धाक उरलेलाच नाही,अशी अवस्था निर्माण झाली असून,अवैध व्यवसायिकांनी राजरोसपणे दुकाने थाटून बेकायदेशीर व्यवहार सुरू ठेवले आहेत.याचा थेट फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत असून अनेक घरांची चूलच पेटत नाहीये,कर्ज, ताणतणाव आणि कुटुंबविघटन वाढत आहे.

 

मधुकर नगर, भोजला, गायमुख नगर, इटिवावार्ड, निंबी पारडी, वालतूर अशा भागांत खुलेआम सुरू असलेले वरळी मटका व जुगाराचे अड्डे पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेची जिवंत साक्ष देत आहेत.इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असताना ते पोलीस ठाण्याच्या नजरेआड कसे राहू शकतात ? की मुद्दाम डोळेझाक केली जात आहे ? असा थेट आणि जळजळीत सवाल आता गावोगावच्या जनतेतून उपस्थित होत आहे.

अजून धक्कादायक बाब म्हणजे, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सहन केले जाणार नाहीत,दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्या आदेशांना केराची टोपली दाखवत असल्याची चर्चा आहे.स्वहित साधण्यासाठी अवैध व्यवसायिकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवले जात असल्याचा आरोप आता उघडपणे सुज्ञ नागरिक करत आहेत.

पोलीस प्रशासनाच्या या मूकसंमतीमुळे मटका-जुगार चालविणाऱ्यांचे मनोबल प्रचंड वाढले आहे.परिणामी कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून तरुण पिढी जुगार आणि व्यसनाच्या गर्तेत सापडत आहे. समाजात आर्थिक, नैतिक आणि सामाजिक अधःपतन वेगाने वाढत चालले आहे.ही, बाब आता लपून राहिलेली नाही.या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत नगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना जाब विचारणार का ? कार्यक्षेत्रातील अवैध मटका-जुगार अड्डे तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ठोस, कठोर कारवाई होणार की नाही ? की हे धंदे असेच पोलीस आशीर्वादाने सुरू राहणार ? हा प्रश्न आता संपूर्ण पुसद तालुक्यातील ग्रामीण जनतेकडून थेट विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या