हेलिपॅड परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास अटक; वसंतनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव :- 

 

पुसद शहरातील कायदा–सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर ठरू शकणारी घटना टळली असून, वसंतनगर पोलिसांनी वेळेत कारवाई करत गावठी कट्टा (रिव्हॉल्व्हर) बाळगणाऱ्या तरुणास अटक केली आहे.

पोलिस स्टेशन वसंतनगर, पुसद अंतर्गत गायमुख नगर ते हेलिपॅड मैदान परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या बसलेला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे यांनी पंचांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हेलिपॅड मैदानाजवळ पाहणी केली असता एक तरुण संशयास्पद अवस्थेत बसलेला आढळून आला. पंचांच्या साक्षीने त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा (रिव्हॉल्व्हर) व एक जिवंत काडतूस सापडले. चौकशीत त्याने आपले नाव हजरत बिलाल शेख मुसा (वय २१, रा. मधुकर नगर) असे सांगितले. सदर इसमाकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणे या गंभीर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई कुमार चिंता (पोलीस अधीक्षक) आणि अशोक थोरात (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच हर्षवर्धन बी. जे. व सतीश जाधव यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, अशोक चव्हाण, प्रफुल्ल इंगोले, सुरेश राठोड व श्रीकांत राठोड यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद आवळकर करीत आहेत.वसंतनगर पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे शहरात संभाव्य अनुचित प्रकार टळला असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या