संशयास्पद १० तोळे सोन्याचा पर्दाफाश : मुंबई पोलिसांची महागावात छापेमारी, सराफा व्यावसायिकांत खळबळ

⚫लोलवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव :- 

 संशयास्पद दहा तोळे सोन्याच्या व्यवहाराच्या तपासासाठी मुंबई पोलीस थेट महागावात दाखल झाल्याने शहरातील सराफा व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली आहे. सोन्याचा मूळ स्रोत, व्यवहारातील साखळी आणि आर्थिक देवाणघेवाण उघड करण्यासाठी पोलीस तपास वेगाने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका महिलेने विक्रीस आणलेले दहा तोळे सोने संशयाच्या भोवऱ्यात सापडले. ही महिला चुरमुरा (ता. उमरखेड) येथील मूळ रहिवासी असून सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. तिने मुंबईहून हे सोने उमरखेड तालुक्यात आणून महागाव येथील एका मोठ्या बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकाकडे विक्रीसाठी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

प्राथमिक चौकशीत सदर सोने २० ते ३० वर्षे जुने असल्याचा दावा करून विक्रीचा बनाव करण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित सराफाने हे सोने महागावातील एका गलई (रिफायनरी) दुकानात शुद्धीकरणासाठी दिले होते. या व्यवहारात सुमारे ९ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचेही सूत्रांकडून समजते.

संशय बळावल्यानंतर प्रकरणाचे बिंग फुटले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी प्रथम चुरमुरा येथे तपास केला आणि उमरखेड पोलिसांच्या मदतीने तपास पथक महागावात दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत सराफा लाईनमध्ये संबंधित सराफ, गलई व्यावसायिक व इतरांकडून सखोल चौकशी करण्यात आली.

 

मुंबईहून आणलेल्या या दहा तोळे सोन्याचा नेमका उगम काय, ते कोणाचे होते आणि या व्यवहारातून कोणाला किती आर्थिक लाभ झाला, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू असून अंतिम सत्य पोलिस तपासातूनच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू असून आवश्यकतेनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या