ऊस वाहतुकीत नियमभंग खपवून घेतला जाणार नाही; उल्लंघन केल्यास कडक कारवाई – सपोनि निलेश शेंबडे

 

⚫लोकवेध न्युज नेटवर्क 

उमरखेड :- 

 

वसंत साखर कारखाना, पोफाळी येथे ऊस वाहतुकीदरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. पोफाळी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांच्या उपस्थितीत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक चालक तसेच मालक यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

बैठकीत वाहनांच्या ट्रॉलीच्या मागील बाजूस इंडिकेटर व रिफ्लेक्टर बसवणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. वाहन चालविताना गाणे वाजवू नये, मोबाईलवर बोलू नये व पूर्ण लक्ष वाहन चालविण्यावर ठेवावे, असे निर्देश देण्यात आले. वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून मद्यपान करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. असे आढळून आल्यास कोणतीही तडजोड न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

अरुंद रस्त्यावर व वळणावर ओव्हरटेक करण्यास मनाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी ट्रॉलीच्या मागे रेड रिफ्लेक्टर किंवा रेडियम असणे अनिवार्य असून हेडलाईट व टेललाईट्स सुरू ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. ट्रॉलीच्या क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरू नये व ऊस बाहेर लोंबकळणार नाही याची काळजी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

ऊस वाहतुकीदरम्यान ऊस योग्यरीत्या दोरी किंवा साखळीने बांधलेला असावा, जेणेकरून रस्त्यावर ऊस पडून अपघात होणार नाही. डबल ट्रॉली असल्यास वळण घेताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. ट्रॅक्टर फक्त नेमून दिलेल्या पार्किंग झोनमध्येच उभे करावेत व रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स व ट्रॅक्टर-ट्रॉलीची सर्व आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी ब्रेक व टायरची तपासणी करावी. ट्रॉली मागे घेताना किंवा वळवताना क्लिनरची मदत घ्यावी, असेही सांगण्यात आले.

या सर्व सूचनांची अंमलबजावणी न केल्यास संबंधित चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सपोनि निलेश शेंबडे यांनी स्पष्ट करत ऊस वाहतूक सुरक्षित व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या