२० लाखांची नोकरी फसवणूक:महिला मुख्य आरोपी अद्याप मोकाट; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न

ज्ञानेश्वर ठाकरे: यवतमाळ 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

पांढरकवडा तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी छाया पाटील यांच्या मुलीला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी महिला मुख्य आरोपी अद्याप अटकेबाहेर असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या फसवणूक प्रकरणातील महिला आरोपीला अटक न करता केवळ सूचना पत्र देऊन सोडण्यात आले आहे.विशेष म्हणजे, संबंधित आरोपी महिलेचा जामीन उच्च न्यायालयाने नामंजूर केला असतानाही पोलिसांकडून तिला अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याचा आरोप फिर्यादी छाया पाटील यांनी केला आहे.या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल असून, सदर महिला ही मुख्य आरोपी असल्याचे फिर्यादीने स्पष्ट केले आहे. मात्र, गुन्हा नोंद होऊन आठ महिने उलटून गेले तरीही आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि क्राईम जगतात चर्चेला उधाण आले आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, संबंधित महिला आरोपी झरी तालुक्यातील मुकुटबन येथे वास्तव्यास आहे. आरोपीचा संपूर्ण पत्ता व माहिती पोलिसांकडे उपलब्ध असतानाही अटक न होणे, तसेच केवळ सूचना पत्रावर सोडण्यात येणे, यामुळे पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे पांढरकवडा परिसरात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून, कायदेशीर प्रक्रियेनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, उच्च न्यायालयाचा जामीन नकार असूनही आरोपीवर ठोस कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या