फुलसावंगीच्या हाय प्रोफाईल जुगारावर दररोज १० लाखांची उलाढाल !  पोलीसांच्या हप्ताखोरीमुळे जुगारावर गोरगरीबांची लुट

 

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव:- 

रेती तस्करीचा सेंटर पॉईंट ठरलेल्या फुलसावंगीत गेल्या दोन महिन्यांपासून हाय प्रोफाईल जुगार अड्डा सुरू करण्यात आला आहे.यवतमाळ जिल्ह्यात सर्वात मोठा ठरलेल्या या जुगार अड्डयावर दररोज १० लाख रुपयांची उलाढाल होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कित्येक आंबटशौकिनांची फुलसावंगीच्या अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी तोबा गर्दी होत आहे.

 

ढाणकी रस्त्यावरील एका शेतात हा जुगार अड्डा सुरू करण्यात आला असून,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आणि सत्ताधारी पक्षाच्या राजकारण्यांचे नातलग या जुगार अड्डयाचे कर्तेधर्ते असल्याची माहिती आहे. फुलसावंगीत आधीच अवैध धंद्यांची रेलचेल आहे. त्यात या हायप्रोफाईल जुगार अड्ड्याची भर पडली आहे. महागाव पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना “लक्ष्मी” चा प्रसाद देऊन हा जुगार अड्डा थाटण्यात आल्याचे कळते. ढाणकी रस्त्यावरील या जुगार अड्डयात अनेक जण लाभार्थी आहेत. दररोज शेकडो शौकिन येथे जुगार खेळतात. जुगार खेळण्यासाठी गावातील व परिसरात असलेल्या खेड्यापाड्यातील तरुण आणि अल्पवयीन मुलांचीही मोठी गर्दी होताना दिसत आहे. 

 

ऑडी, फॉर्च्युनर, इन्नोव्हा, क्रेटा, सफारी अशा महागड्या गाड्यांमधून उच्चभ्रू जुगारी येथे जुगार खेळायला येतात त्यामुळे परिसरात वाहनांची मोठी वर्दळ होताना दिसत आहे. या जुगाराच्या नादी लागून गोरगरीब कुटुंबातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी आणि रोज मजूर उद्ध्वस्त होत असल्याचे विदारक चित्र आहे. येथे ड्युटीवर असलेल्या बीट जमादाराने डोळ्यावर कातडे ओढून घेतले असून त्याची या अवैध जुगार अड्ड्यास मुक संमती असल्याची चर्चा आहे. महागाव पोलीस ठाणे आणि एलसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत रोज उठबस असलेल्या काही समाजकंटकांची या जुगार अड्ड्यात भागीदारी असल्याचे कळते. फुलसावंगीत एवढा मोठा जुगार अड्डा सुरू असताना पोलीस काहीच कारवाई करत नसल्यामुळे यात त्यांचे हात ओले झाल्याची तालुक्यात चर्चा आहे. सत्तेतील राजकीय वरदहस्त असल्यामुळे आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही अशी मुजोरी जुगार चालक करीत आहेत.

 

महागाव तालुक्यात रेती तस्करी आणि गावठी दारू प्रचंड प्रमाणात बोकाळली आहे.वाडी वाकोडी येथे रेती तस्करांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना परवा घडली, हल्लेखोरांना प्रतिकार करताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाने हवेत गोळीबार केला आणि स्वतःचा जीव वाचविला. महागाव तालुक्यातील गुन्हेगारीचे भीषण रूप सर्वांनी अनुभवले असताना फुलसावंगी येथील जुगार अड्ड्याला महागाव पोलीस प्रशासन खुली सूट कशी देत आहे,याबद्दल तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.फुलसावंगी येथील जिल्हास्तरीय जुगार अड्ड्याला थेट पोलिसांचे संरक्षण असल्याची चर्चा असून सामान्य माणसांना या जुगार अड्ड्यावर लाखो रुपयांनी अक्षरशः लुटले जात आहे. रेती तस्करीवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची नाही असे स्टेटमेंट पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी नुकतेच महागाव पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारांना दिले होते. आता जुगार अड्ड्यावर सुद्धा पोलिसांना कारवाई करायचा अधिकार आहे किंवा नाही हे पोलीस अधीक्षकांनी एकदा स्पष्ट करावे अशी जनभावना आहे.

—————————————————————————————

जिथे कुठे हा जुगार अड्डा असेल या संदर्भात आम्ही कार्यवाही करून अड्डा बंद पाडून कार्यवाही केल्याजाईल,तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सदैव अग्रेसर आहोत.

 

धनराज निळे,ठाणेदार महागाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या