रेती कारवाई प्रकरणात नवे वळण; गोळीबाराच्या घटनेनंतर आणखी आरोपी अटकेत, वरिष्ठांकडून चौकशीचे संकेत

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव : – 

 

महागाव तालुक्यातील मोरथ,वाकोडी नदीपात्रात १८ डिसेंबर रोजी रेती वाहतुकीदरम्यान झालेल्या हाणामारी व गोळीबाराच्या घटनेला आज नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास करत आणखी काही आरोपींना अटक केली असून,संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.१८ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजता घरकुल बांधकामासाठी रेती काढण्याचा परवाना असल्याचा दावा करणारे काही ट्रॅक्टर चालक नदीपात्रात रेती उपसा करत असताना ही घटना घडली होती. अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी महागाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे घटनास्थळी दाखल झाले असता ट्रॅक्टर चालक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे हाणामारीत रूपांतरित झाला.

 

दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काही तरुणांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.यावेळी आत्मसंरक्षणासाठी त्यांनी शासकीय रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते.गोळीबाराच्या आवाजाने परिसरात गोंधळ उडाला होता.या,घटनेत शेख गुलाब (वय २५) हा तरुण जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पुसद येथे दाखल करण्यात आले होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे हेही गंभीर जखमी झाले होते त्यांना सुद्धा पुसद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या, घटनेनंतर ठाणेदार धनराज निळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. आजच्या घडामोडीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, घटनेतील सर्व बाबी तपासल्या जात आहेत.

 

दरम्यान, कारवाईदरम्यान महसूल विभागाशी समन्वय न साधता, वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता व सिव्हिल ड्रेसमध्ये कारवाई केल्याच्या मुद्द्यावरही अंतर्गत चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड येथील हनुमंत गायकवाड रजेवर होते.आज ते रुजू झाले असून त्यांनी महागाव येथील पोलिस ठाण्यात येऊन रीतसर कार्यवाहीत सहभाग घेतला.ते रजेवर असताना त्यांचा अतिरिक्त प्रभार पुसद येथील सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांच्याकडे होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविला जाण्याची शक्यतावर्तवली जात आहे.

 

या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ समोर आल्याचा दावाही करण्यात येत असून, त्याच्या सत्यतेची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. एकूणच, रेती कारवाईदरम्यान घडलेल्या या घटनेवर आता वरिष्ठ स्तरावरून नेमकी कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

⬛ आरोपींना तीन दिवसांचा पी .सी.आर 

 

सदरील घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपींना दिनांक २२ डिसेंबर पर्यंत पीसीआर मिळाल्याची माहिती ठाणेदार धनराज निळे यांनी भ्रमणध्वनी वरून बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या