वाकोडीतील रेती तस्करांचा धुडगूस : एपीआय सुनील अंबुरे यांच्यावर प्राणघातक हल्ला, आत्मसंरक्षणात गोळीबार

⚫लोकवेध न्युज नेटवर्क 

महागाव : – 

वाडी (वाकोडी) येथे रेती तस्करीवर कारवाईसाठी गेलेल्या महागाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांच्यावर सहा रेती माफियांनी दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. जीव वाचवण्यासाठी अंबुरे यांनी आपल्या सर्व्हिस रिवॉल्वरमधून गोळीबार केला. या घटनेत अंबुरे गंभीर जखमी झाले असून एक रेती तस्करही जखमी झाल्याची माहिती आहे.

पुस नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती तस्करीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एपीआय सुनील अंबुरे हे शिपाई विशाल गेडाम यांच्यासह दुचाकीवरून वाडी येथे पोहोचले. गावातील चौकात ट्रॅक्टरच्या साहाय्याने खुलेआम रेती वाहतूक सुरू असतानाच कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तस्करांनी अचानक हल्ला चढविला. दगड, सिमेंटच्या विटा आणि हातात मिळेल त्या वस्तूंनी अंबुरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना जागीच संपविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच प्रसंगावधान राखत अंबुरे यांनी दोन राऊंड फायर केले. पहिली गोळी एका आरोपीच्या खांद्याला लागली, तर रिवॉल्वर हिसकावण्याच्या झटापटीत दुसरी गोळी अंबुरे यांच्या डाव्या तळहातात घुसली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

गोळीबाराचा आवाज ऐकून गावकरी जमा झाले. तोवर रेती तस्कर ट्रॅक्टरसह फरार झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार अभय मस्के आणि ठाणेदार धनराज निळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी अंबुरे यांना उपचारासाठी पुसद येथे हलविण्यात आले असून रात्री त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच पुसदचे परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी वाडी येथे भेट देऊन घटनास्थळाचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांनी जोरदार सर्च ऑपरेशन राबविले. मोरथ गावातील नन्नू शेख (५५), हबीब शेख (६०) आणि लालू खाजा शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून शेख गुलाब शेख खाजा याच्यासह अन्य तिघे फरार आहेत. फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

⬛रेती तस्करांवर कारवाई पोलिसांची जबाबदारी नाही; पोलीस अधीक्षकांचा वादग्रस्त खुलासा

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. रेती तस्करी हा महसूल प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय असून थेट कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी नसल्याचे त्यांनी सांगितले. महागाव तालुक्यात रात्री उशिरापर्यंत रेती माफियांचा खुलेआम वावर आणि शस्त्रसाठ्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता समाधानकारक उत्तर न देता त्यांनी टाळाटाळ केली.पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला होऊनही जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार संतापजनक असून, रेती माफियांच्या दहशतीपुढे प्रशासन हतबल झाले आहे का? असा थेट सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

⬛२० डिसेंबर २०२३ ला तलाठ्यावर गौण खनिज तस्करांचा झाला होता जीवघेणा हल्ला

गौण खनिज तस्करीला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर रेती व माती माफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी मोळके हे गंभीर जखमी झाले होते.तसेच तहसील कार्यालयाचे वाहन चालक आडे किरकोळ जखमी झाले. बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास काळी टेंभी परिसरात ही घटना घडली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी महागाव तहसील कार्यालयात विभाग निहाय आढावा बैठक घेऊन सक्त कार्यवाहीचे आदेश दिले.दरम्यानच्या काळात घटना अजून थांबल्या नाहीत अजून तीव्र होतांना दिसत आहेत.आजच्या घटनेने पुन्हा एकदा माफिया राज महसूल आणि पोलिस प्रशासनावर वरचढ असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या