तहसील कार्यालयातून जप्त ट्रॅक्टरची चोरी : महसूल प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ, संघटित गौणखनन माफियांना अभय ?

⚫लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव : –
अवैध गौणखननावर कारवाई करून तहसील कार्यालयाच्या ताब्यात ठेवलेला ट्रॅक्टरच चोरट्यांनी पळवून नेल्याची अत्यंत गंभीर व धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय ताब्यातील वाहनाची उघडपणे चोरी होणे म्हणजे केवळ कायद्याची पायमल्ली नसून, महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रकार ठरत आहे.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांच्या १७ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी अवैधरित्या १ ब्रास मातीचे उत्खनन व वाहतूक करणारा निळ्या रंगाचा, विना नंबर सोनालीका DI 745 III मॉडेलचा ट्रॅक्टर जप्त करून महागाव तहसील कार्यालयात दंडात्मक कारवाईसाठी ठेवण्यात आला होता.
मात्र त्याच दिवशी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर मालक दिलीप सदाशीव येरवाळ, योगेश सदाशिव येरवाळ, अनिकेत येरवाळ, पिंटू कटारे (सर्व रा. सवना, ता. महागाव) तसेच इतर अनोळखी व्यक्तींनी संगनमताने तहसील कार्यालयातून हा ट्रॅक्टर बेकायदेशीररित्या पळवून नेल्याचा आरोप आहे. चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरची अंदाजे किंमत सुमारे सात लाख रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे.या घटनेमुळे महसूल विभागाच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला असून शासनाच्या ताब्यातील वाहनाची संघटित पद्धतीने चोरी,सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर महागाव पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देवानंद शिवाजी कायंदे करीत असून पळवून नेलेला ट्रॅक्टर पुन्हा तहसीलच्या ताब्यात मिळवून दंडात्मक कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विशेष म्हणजे, यापूर्वीही अवैध गौणखनन प्रकरणात तहसील कार्यालयात जप्त असलेली वाहने चोरीला गेल्याच्या घटना पोलिस दप्तरी नोंद आहेत.असे असतानाही तहसील कार्यालय परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था नसणे,सुरक्षेचा अभाव आणि वारंवार घडणाऱ्या घटनांकडे होणारे दुर्लक्ष हे महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक मानले जात आहे.
या प्रकारामुळे तालुका दंडाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, काही प्रकरणांत महसूल प्रशासनाकडून प्रकरण मॅनेज करून संघटित गौणखनन करणाऱ्या गुन्हेगारांना अप्रत्यक्ष अभय दिले जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे.घरकुल योजना यांसारख्या विषयांकडे लक्ष वळवून अशा गंभीर गुन्ह्यांवर पडदा टाकला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.तहसील कार्यालयातूनच शासकीय वाहन चोरीला जाणे ही घटना केवळ चोरी नसून,संपूर्ण महसूल यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा देणारी आहे. आता तरी या प्रकरणात कठोर कारवाई होणार का ? की,पुन्हा एकदा संघटित गुन्हेगार मोकळे होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
