सरपंचपुत्रावर गोवंश तस्करीचे गंभीर आरोप; महागाव पोलिसात थेट तक्रार दाखल

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव : –
महागाव तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या मुलावर गोवंश तस्करीचे गंभीर आरोप करत महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार अमजदखान युसुफ खान पठाण यांनी दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी ही लेखी तक्रार दिली आहे.तक्रारीनुसार, शेख राजीख शेख युनुस (रा. वाकोडी) हा वाकोडी येथील सरपंच यांचा मुलगा असून, वडील सरपंच असल्याचा गैरफायदा घेत तो गाय-बैल आदी जनावरांच्या विक्रीसाठी खोटे जनावरांचे दाखले तयार करून देत असल्याचा आरोप आहे. या बनावट दाखल्यांच्या आधारे दररोज रात्री पुसद व उमरखेड परिसरात गोवंशाची तस्करी केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रारदाराने पुढे म्हटले आहे की,यापूर्वीही संबंधित व्यक्तीविरोधात महागाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३९५ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख आहे. एवढेच नव्हे तर, मागील वर्षी धारमोहा येथे गुंड प्रवृत्तीची भाषा वापरत थेट पोलिसांवर हल्ला केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
खोटे दस्तऐवज तयार करून जनावरांचे दाखले देणे, गोवंश तस्करी करणे व कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी कृत्ये केल्याचा आरोप असल्याने संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी अमजदखान युसुफ खान पठाण यांनी महागाव पोलिसांकडे केली आहे.या प्रकरणी महागाव पोलीस काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
