शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता बळकावला; खेडी वनोलीतील शेतकरी संतप्त, कारवाई नाही तर बेमुदत उपोषण व तीव्र आंदोलनाचा इशारा

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव (यवतमाळ)
महागाव तालुक्यातील खेडी (वनोली) गावात शेतकऱ्यांच्या हक्काच्या सार्वजनिक/शेतकरी रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हा,रस्ता चुकीच्या पद्धतीने गावनमुना क्रमांक ८ मधून हटवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर बेमुदत उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गावातील हा सार्वजनिक शेतकरी रस्ता अनेक शेतकऱ्यांसाठी शेतीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. मात्र, कोणताही वैध गावनमुना–८ नसतानाही हिमराज लालासिंग राठोड यांनी थेट या रस्त्यावर अतिक्रमण करून घराचे बांधकाम सुरू केल्याचा निवेदनातून ग्रामस्थांनी आरोप केला आहे.या बेकायदेशीर बांधकामामुळे शेतकऱ्यांची शेतात ये-जा पूर्णपणे ठप्प झाली असून बैलजोडी, ट्रॅक्टर तसेच शेतीमालाची वाहतूक बंद पडली आहे. परिणामी अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या,गंभीर प्रकरणी ग्रामस्थांनी यापूर्वीही प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी तहसीलदार, महागाव यांना निवेदन देण्यात आले होते, तर २४ डिसेंबर २०२५ रोजी मा. गटविकास अधिकारी यांच्याकडेही सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम आजतागायत थांबवण्यात आलेले नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करत रोशन सुधाकर चव्हाण (रा. खेडी–वानोली) यांनी पुराव्यांसह उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उमरखेड यांच्याकडे सविस्तर लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनासोबत प्रत्यक्ष जागेची छायाचित्रे महागाव गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची प्रत, तहसील कार्यालयाचा अधिकृत नकाशा (अतिक्रमण दर्शविणारा) तसेच संबंधित रस्ता सार्वजनिक असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव जोडण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता बळजबरीने बंद केल्यामुळे हा विषय केवळ महसूल प्रशासनापुरता मर्यादित न राहता कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न बनत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास गावात तणाव वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.या, आंदोलनाला खेडी (वानोली) येथील शेतकरी व महिला मंडळाचा व्यापक आणि ठाम पाठिंबा असून, सार्वजनिक रस्ता पूर्ववत मोकळा होईपर्यंत संघर्ष थांबवणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
