७६ कुटुंबांना हक्काचे घर; जगदीश नरवाडेंचा समाजकारणाला ठोस न्याय

⚫लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव : –
घरकुल योजनेतून गरजू नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे, या उदात्त हेतूने जमीन मालक जगदीश उत्तमराव नरवाडे यांनी आमनी येथे ऐतिहासिक सामाजिक उपक्रम राबविला आहे. त्यांच्या मालकीच्या जमिनीवरून तब्बल ७६ लाभार्थी कुटुंबांना मालकी हक्काची जमीन देत खरेदीखत व सातबारा उतारे थेट त्यांच्या नावावर करून देण्यात आले आहेत.
या जागेचे नामकरण “उत्तमराव शंकरराव नरवाडे बिटरगावकार नगर” असे करण्यात आले असून, अनेक वर्षांपासून घरकुलासाठी जमीन नसल्यामुळे वंचित राहिलेल्या कुटुंबांचा प्रश्न या उपक्रमामुळे कायमस्वरूपी सुटला आहे. आता या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा थेट लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तहसीलदार अभय मस्के, पंचायत समितीचे बीडीओ दत्तात्रय कदम, तलाठी सीमा कदम, तसेच आमनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुनीता सुनील राठोड, शंकर चव्हाण, बाबुसिंग राठोड, गजानन गायकवाड, दादाराव चवरे, उत्तमपुरी आदींचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रशासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण होऊ शकली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल महागाव पंचायत समितीचे बीडीओ दत्तात्रय कदम यांनी कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन जगदीश नरवाडे यांचा सत्कार केला. तर लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत सिंधुताई उत्तमराव नरवाडे, जगदीश नरवाडे व सौ. रसिका जगदीश नरवाडे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने कपडे आहेर करून सन्मान केला व आभार मानले.या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सुरक्षितता, स्थैर्य व आत्मसन्मान निर्माण झाला असून, समाजातून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
—————————————————————————————
जीवनात समाजाला काहीतरी देणं लागते या भावनेतून माझ्या वडिलांनी तीस वर्षांपूर्वी लोकांना राहण्यासाठी दिलेल्या जागा त्यांच्या नावावर सातबारा करून दिल्या. अडीच एकर जमीन प्रॉपर्टीतून कमी झाली, पण ७६ कुटुंबांना घरकुलाचा मार्ग मोकळा झाला.याचा मला मनापासून आनंद आहे.
जगदीश नरवाडे, संस्थापक अध्यक्ष,जनआंदोलन आधार संघर्ष समिती.
