आधारभाव नाकारल्याने संताप; महागाव बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचे धरणे, एपीएमसी लुटीचे केंद्र; राष्ट्रीय किसान मोर्चाचा आरोप

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव : – 

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीनुसार सोयाबीन, कापूस, तूर, हळद आदी पिकांची खरेदी करण्यात यावी, तसेच आधारभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापारी व खाजगी केंद्रांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतमालाच्या पणनाची प्राथमिक जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हाधिकारी कार्यालय व पणन महामंडळ या तीन स्तरांवर असतानाही मागील सात दशकांपासून शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याची तीव्र टीका आंदोलनकर्त्यांनी केली. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून, आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधील नियम ३२(घ) लागू असतानाही बाजार समिती क्षेत्रात किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने सर्रास खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. बाजार समितीने आपल्या अधिकारांचा वापर करून ही लूट थांबवावी, मार्केट यार्डमध्ये तातडीने आधारभाव खरेदी केंद्र सुरू करावे व सरकारने भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच सन २०२१ ते २०२५-२६ या कालावधीत बाजार समितीने हमीभावात खरेदी केलेल्या शेतमालाचा तपशील तसेच आधारभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल जाहीर करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

राष्ट्रीय किसान मोर्चाच्या राज्यव्यापी चरणबद्ध आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील हे आंदोलन असून, यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष चक्रधर देवसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनिष जाधव, विद्वान केवटे, गोविंदराव देशमुख, पंजाबराव गावंडे, साई काळे, देवराव पाईकराव, देविदास कदम, प्रमोद देशमुख, शेख सलिम, विनोद बनसोडे, रमेश कांबळे, तानाजी जाधव, ज्ञानेश्वर जाधव, तुकाराम सोयाम, निरंजन तडस, भगवान खंदारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या