सीसीआय कापूस केंद्रात लाचेची तक्रार; कर्मचारी आसिफ पठाणांचा आरोपांना ठाम विरोध

⚫लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव :
गुंज येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यावर लाचेची मागणी केल्याचा आरोप मौजे बेलदरी येथील शेतकरी रुपचंद आडे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, कर्मचारी आसिफ खान पठाण यांनी ७/१२ ऑनलाइन, अप्रुव्हल प्रक्रिया आणि कापूस ग्रेडिंगसाठी २० हजार रुपये मागितल्याचा आरोप आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये दिल्यानंतर दोन गाड्यांचे स्लॉट मिळाले, तर उर्वरित रक्कम न दिल्याने तिसरी गाडी ‘ओलावा आणि कवडी जास्त’ असल्याचे सांगून रिजेक्ट केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
रिजेक्ट झालेला कापूस खाजगी व्यापाऱ्याकडे कमी दराने विकावा लागल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे आडे यांनी सांगितले. तसेच लाचलुचपत विभागाशी संपर्क साधल्यानंतर आसिफ पठाण यांनी दुसऱ्या नंबरवरून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कर्मचारी आसिफ पठाण यांनी सर्व आरोप फेटाळले. “मी दोषी असल्यास कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले,तक्रारदार हा शेतकरी नसून व्यापारी आहे. पैशाचा व्यवहार झाला असेल तर पुरावा दाखवावा. कोणताही पुरावा नसताना माझ्यावर सूडबुद्धी घेतल्या जात असल्याचे पठाण म्हणाले.
पठाण यांनी पुढे असा आरोपही केला की, “विद्यमान सभापती आणि माजी सभापती यांनी त्यांच्या मर्जीतील नातलग असलेल्या चव्हाण नामक कर्मचाऱ्याला केंद्र अधिकारी म्हणून केंद्रावर नियुक्त करण्यासा.ठी राजकीय खलबत सुरु आहे. या प्रकारात तक्रारदार आणि संबंधित गटाकडूनच आर्थिक व्यवहार झाल्याचा आम्हाला संशय असल्याचा खुलासा देखील केला आहे.
