उदय नरवाडे यांचा मानवतेचा दीप; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘मिशन उभारी’तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धान्य किट वाटप

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
यवतमाळ :—
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामाजिक बांधिलकीचा सशक्त संदेश देत महागाव नगरीचे माजी उपनगराध्यक्ष उदय भाऊ नरवाडे यांच्या पुढाकारातून मिशन उभारी अंतर्गत यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
या मानवतावादी उपक्रमावेळी विकास मीना, जिल्हाधिकारी यवतमाळ,तसेच अभय मस्के, तहसीलदार महागाव हे,उपस्थित होते.
उदय भाऊ नरवाडे यांनी नववर्षाच्या मंगलदिनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देत समाजाप्रती आपली संवेदनशील व जबाबदार भूमिका अधोरेखित केली.आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना तात्काळ आधार देणारा हा उपक्रम असून, त्यांच्या या लोकाभिमुख कार्याचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत यापूर्वीही अनेकदा गरजूंसाठी पुढाकार घेणाऱ्या उदय नरवाडे यांनी मानवी मूल्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा महागाव नगराध्यक्षपदी निवडीची संधी मिळावी,अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गरिबांच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश निर्माण करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे
