खो-खोमध्ये कलगाव शाळेची थेट जिल्हास्तरावर झेप

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

 महागाव : – 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कलगाव या शाळेने शालेय क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत नवा इतिहास रचला आहे. प्रथमच शाळेत खो-खो या पारंपरिक सांघिक खेळाची सुरुवात करण्यात आली आणि पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत थेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो (सांघिक) प्रकारात कलगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली. यासोबतच रिले स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत संघभावना, वेग आणि शिस्तीचे उत्कृष्ट दर्शन घडवले.

वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. १०० मीटर धावणे व लांब उडी या स्पर्धांत प्रथम क्रमांक, लहान गट रिलेमध्ये प्रथम क्रमांक, तर २०० मीटर धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडा परंपरेत नवा अध्याय जोडला.

या उज्वल यशामागे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे प्रेरणादायी नेतृत्व तसेच शाळा व्यवस्थापनाचा मोलाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमच खो-खोची सुरुवात करून थेट जिल्हास्तर गाठणे हे कलगाव शाळेच्या क्रीडा इतिहासातील प्रेरणादायी आणि सुवर्णअध्याय ठरले आहे. या यशाचे श्रेय खो-खो मार्गदर्शक शिक्षक बाबासाहेब आचार्य, मुख्याध्यापक साहेबराव भांगे, रमेश पवार, गजानन खराटे, शिवशंकर पंचपुत्रे, बालाजी देशमाने, सौ. शलाका राजे, शिक्षणप्रेमी प्रितम सर खंदारे तसेच केंद्रप्रमुख बाबू खंदारे यांना जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या