केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प. शाळा कलगावचा दबदबा विद्यार्थ्यांची सर्व विभागात दमदार कामगिरी, विजयी झेंडा फडकवला

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा, कलगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्वत्र आपली छाप पाडली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत कलगाव शाळेने स्पर्धेत विजयी झेंडा फडकवला.या यशानिमित्त शाळेत आयोजित बक्षीस वितरण समारंभात विजयी व सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष गजानन सोनटक्के हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच श्रीधर भवानकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लिंबाजीराव वानखेडे, परमेश्वर भंडारे, सुनील कदम, लक्ष्मण गावंडे, सुशिलभाऊ गावंडे, गजानन नावाडे, दत्तराव नावाडे, मारोतराव कल्याणकर, दिलीप आगरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ, माता-पालक व शिक्षक उपस्थित होते.
क्रीडा यशाचा आढावा घेतला असता, लांबउडी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. नेहा घेडबळे हिने कॅरम स्पर्धेत विजेतेपद मिळवले, तर रोहित आगरकर याने लांबउडीत उल्लेखनीय यश संपादन केले. बुद्धिबळ स्पर्धेत इयत्ता सातवीतील कु. गौरी इंगळे हिने प्रथम, तर गणेश इंगळे याने उपविजेतेपद मिळवले.खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रांजली देशमाने हिने प्रथम क्रमांक मिळवत आपली वेगवान छाप पाडली. कॅरम प्रकारात स्वराज लक्ष्मण गावंडे, तर बुद्धिबळात श्रेयश वानखेडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
विविध क्रीडा व व्यक्तिमत्त्व स्पर्धांमध्ये करण आगरकर, मयंक भांडवले, गणेश भंडारे, सार्थक नावाडे, शिवराज आगरकर, रुद्र पिलवंड यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात वैभवी कदम, स्नेहल बहापुरे, दिव्या कानडे यांच्यासह इतर विद्यार्थिनींनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.या, सर्वांगिण यशामुळे संपूर्ण गावात आणि शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक साहेबराव भांगे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब आचार्य यांनी केले, तर आभार रमेश पवार यांनी मानले. शेवटी उपसरपंच श्रीधर भवानकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
