उपदानाचा गैरवापर करून पत्नीच्या नावावर घरखरेदी, बा.ना. सुतगिरणीच्या कार्यकारी संचालकाची “अशी ही , बनवाबनवी.. पंजाबराव खडकेकर यांची वस्त्रोद्योग आयुक्तांकडे तक्रार

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

सेवा समाप्ती झालेली नसताना नियमबाह्य पद्धतीने सेवेतील उपदानाची रक्कम (ग्रॅच्युइटी) उचलून त्या रकमेचा वापर पत्नीच्या नावावर घर खरेदीसाठी केल्याचा गंभीर आरोप बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणी, पिंपळगाव (कान्हा), जि. यवतमाळ येथील कार्यकारी संचालक एम. आय. पातरी यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई करून पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी सुतगिरणीचे सभासद पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी वस्त्रोद्योग आयुक्तांकडे केली आहे.

सन २०२२ मध्ये एम. आय. पातरी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ३६ व ७३ तसेच संस्थेच्या उपविधीतील तरतूद क्र. ३५ चा भंग करून नियमबाह्यरीत्या उपदानाची रक्कम उचलली. या रकमेचा वापर करून पुसद येथे त्यांच्या पत्नी रोशन बानू मोहम्मदरफी पातरी यांच्या नावावर सुमारे ३४ लाख रुपयांचे पक्के घर खरेदी करण्यात आल्याचा आरोप पंजाबराव खडकेकर यांनी केला आहे.या संदर्भात दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळ व आमसभेत खडकेकर यांनी प्रश्न उपस्थित केला असता, संस्थेच्या अध्यक्षांनी कार्यकारी संचालकांच्या मुलाच्या पुढील वैद्यकीय शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी ‘विशेष बाब’ म्हणून उपदानाची रक्कम देण्यात आली, असे लेखी उत्तर दिले. मात्र हे उत्तर पूर्णतः खोटे व कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचा दावा खडकेकर यांनी केला आहे.

यापूर्वी या प्रकरणी शासकीय कामगार अधिकारी, यवतमाळ यांच्याकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनी व्यवस्थापनास कायद्याचा भंग केल्याबाबत शिस्तभंगाची व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. तथापि, आदेश होऊनही सुतगिरणीच्या व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सहकारी संस्थांमधील कारभार, पदाचा गैरवापर आणि कायद्याची पायमल्ली याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, वस्त्रोद्योग आयुक्तालय या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पराकोटीच्या भ्रष्टाचारामुळे पुसद आणि महागाव तालुक्याची कामधेनू असलेली बाबासाहेब नाईक सहकारी सुतगिरणी डबघाईस आली आहे. ही संस्था बाहेरच्या उद्योजकांना भाडे तत्वावर चालविण्यासाठी द्यावी लागली हे येथील दळभद्री नेतृत्वाचे अपयश आहे. शेतकरी सभासदांची ही संस्था रसातळाला चालली असताना भ्रष्टाचार मात्र वाढतच चालला आहे. एक दिवस या संस्थेला टाळे लागेल अशी अवस्था असून यासाठी संस्था चालविणारे तथाकथित सहकार महर्षी कारणीभूत ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या