राज्यातील थकीत करवसुलीला चालना;मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पन्नास टक्के करसवलत जाहीर
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
ज्ञानेश्वर ठाकरे:
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये मालमत्ता कर, पाणीपट्टी, भाडे-बटी यांसारख्या करांची वसुली अडकलेली असून त्यामुळे पंचायतांच्या विकासकामांवर गंभीर परिणाम होत होता. करांची शंभर टक्के वसुली न झाल्याने मूलभूत सुविधांसह नवीन योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली होती.या पार्श्वभूमीवर शासनाने थकबाकीदारांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत करसवलतीची घोषणा केली आहे.ग्रामपंचायतीतील गृह/व्यावसायिक मालमत्ता धारकांनी २०२५_२६ या वर्षातील पूर्ण कर आणि १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या थकबाकी पैकी ५० रक्कम एकरकमी भरल्यास उर्वरित ५०टक्के रक्कम थकबाकी माफ केली जाणार.या संदर्भात सवलत केवळ अभियानाच्या कालावधीतच लागू होणार असून उशीर झाल्यास लाभ मिळणार नाही.असे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे.
⬛ ग्रामपंचायतींना मोठा आर्थिक आधार
दीर्घकाळ थकीत असलेली कररक्कम जलद गतीने या निमित्ताने वसूल होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामपंचायतींना आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे.पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाशयोजना यांसारख्या मूलभूत सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे.करदात्यांनी एकरकमी जमा करून पन्नास टक्के रक्कम माफीची संधी गमावू नये,आपल्या गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा,असे महागाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी आवाहन केले आहे.
