आधारभूत किंमत मिळत नसेल तर कृउबा समिती कशासाठी ? राष्ट्रीय किसान मोर्चा चा खरमरीत सवाल, १५ डिसेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव : –
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) सोयाबीन, कापूस, तूर, हळद तसेच इतर पिकांची तातडीने खरेदी व्हावी आणि MSP पेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या वतीने महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.मोर्चाच्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की शेतमालाच्या पणनाची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पणन महामंडळ या तिन्ही यंत्रणांची आहे.परंतु सात दशकांपासून या तिन्ही पातळ्यांवर शेतकऱ्यांच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ चा नियम ३२(घ) लागू असूनही बाजारात व्यापारी मनमानी करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.नियम आहे, अधिकार आहे पण कृउबा समितीची कारवाई कुठे ? असा थेट सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला.
⬛१५ डिसेंबरला कृउबा समितीसमोर धरणे आंदोलन
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या राज्यव्यापी चरणबद्ध आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात१५ डिसेंबर, सोमवार रोजी महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.या प्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद जाधव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाब जाधव,उपसभापती बाळू करपे,देवराव पाईकराव,विनोद आडे, नितीन राठोड,ज्ञानेश्वर जाधव,अमोल जाधव, प्रभू राठोड, समाधान बोबडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
