वेणी (बु.) येथे शॉर्ट सर्किटची झळ — अपंग शेतकऱ्याच्या उसाला आग, दहा ते नुकसान; निष्काळजीपणाबाबत वीज विभागावर आरोप

 

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

महागाव : –

 

तालुक्यातील मौजे वेणी (बु.) येथे विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे घडलेल्या आगीच्या भीषण घटनेत अपंग शेतकरी माणिकराव नागोराव पुंडे यांच्या शेतातील ऊस पीक जळून खाक झाले. शनिवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सर्वे नं. १०४ मधील अंदाजे १ हेक्टर ५८ आर (४ एकरांहून अधिक) क्षेत्रातील ऊसाचे पीक पूर्णपणे जळून राख झाले असून शेतकऱ्याचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

ऊस पिकाबरोबरच स्प्रिंकलर यंत्रणेतील आठ तोटी, पाईप, शेती उपयोगी साधने व इतर साहित्यही या आगीत नष्ट झाले. यामुळे शेतीच्या आधारावर उदरनिर्वाह करणाऱ्या पुंडे परिवारास मोठा आर्थिक फटका बसला आहे.वीज विभागाच्या निष्क्रियतेमुळे सदर नुकसान झाल्याचे दिसून येते.? असा स्थानिकांनि आरोप केला आहे.शेतातून जाणारी विद्युत तार तुटून स्पार्किंग झाल्याने आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यापूर्वी अनेकदा फोन करूनही वेळीच दुरुस्ती न झाल्याचा आरोप स्थानिक रहिवासी व शेतकऱ्यांनी वीज विभागावर केला आहे. योग्यवेळी लक्ष दिले असते तर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान टळू शकले असते, असा संताप परिसरात व्यक्त होत आहे.

 

घटनेची माहिती मिळताच तलाठ्यांनी पंचनामा केला. तसेच कृषी विभागानेही अहवाल स्वीकारला आहे. संबंधित शेतकरी अपंग असल्याने शासनाच्या आपत्कालीन मदतीची अपेक्षा अधिक तीव्र आहे. नुकसान भरपाई साठी संबंधित शेतकऱ्यांनी विद्युत विभागाचे अभियंता, ठाणेदार, तहसीलदार तसेच कृषी विभागाकडे लेखी निवेदन दिले आहे. या घटनेने शेतकरी वर्गात चिंता निर्माण केली असून पीडित शेतकऱ्याला तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी,घटनाबाबत चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी,वीज तारांच्या दुरुस्तीतील निष्काळजीपणावर अंकुश ठेवावा ह्या प्रमुख मागण्या जोर धरत आहेत.शेतकऱ्याच्या शेतीवरच कुटुंबाची उपजीविका असताना, झालेल्या या मोठ्या नुकसानीनंतर शासनाने तातडीने मदतीचे हात पुढे करावेत, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या