शेतमातीचा विश्वास जपण्याचा संकल्प, महागाव तालुक्यास नवा कृषी नेतृत्वाचा हात

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव : –
महागाव तालुक्याचे नवे तालुका कृषी अधिकारी म्हणून अंकुश टकले यांनी सूत्रे हाती घेतली असून, याआधी ते जिल्हा अहिल्यानगर येथील शेवगाव तालुक्यात सेवेत होते. पदभार स्विकारताच शेतकऱ्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावणे आणि शासनाच्या कृषी योजनांचा सुयोग्य लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रमुख ध्येय असेल,अशी हमी टकले यांनी दिली.
लोकप्रिय न्यूज पोर्टल लोकवेधला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी कृषी विभागाच्या आगामी कार्यपद्धतीवर प्रकाश टाकत पीकविमा, विविध अनुदान योजना, हवामान बदलाचे वाढते आव्हान, प्रगत व स्मार्ट शेती आणि डिजिटल सुविधा यांसारख्या महत्वाच्या विषयांना प्राधान्याने हाताळण्याची भूमिका मांडली.
शेतकऱ्यांची समस्या हीच आमची जबाबदारी,अशा शब्दांत टकले यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश दिला.त्यांच्या नियुक्तीमुळे महागाव तालुक्यातील कृषी क्षेत्राला नवे दिशा दर्शन मिळेल आणि शेतकरी बांधवांना अधिक दृढ प्रशासनिक आणि मार्गदर्शक पाठबळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
