वागद इजारा शेतशिवारात चौदाफुटी अजगर; वन्यजीव त्रास वाढला शेतकरी नेते मनीष जाधव यांची शासन व वनविभागाकडे ठोस कारवाईची मागणी

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

वागद इजारा येथील शेतकरी भिकन सिताराम राठोड यांच्या शेतात काल (२४ नोव्हेंबर) सायंकाळी ४.४५ वाजता कापूस वेचणीदरम्यान तब्बल १४ फूट लांबीचा अजगर आढळला. राधाबाई राठोड, बेबीबाई राठोड व सत्या देविदास राठोड हे वेचणी करत असताना सत्याच्या नजरेस हा अजगर पडला. घटना पाहताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तत्काळ सर्पमित्र आशिष तानाजी हगवणे (बोरी) यांना संपर्क करून अजगराचे सुरक्षित रेस्क्यू करून घेतले. दरम्यान मागील काही दिवसांपासून या शिवारात बिबट्याचा वावर असून आता अजगरही आढळल्याने शेतकरी व मजुरांची भीती आणखी वाढली आहे. कापूस वेचणी ठप्प झाली असून पेरणीचा वेगही मंदावला आहे.

 

जाधव यांनी सांगितले की, वागद इजारा व बोरी इजारा परिसरात माकड, रानडुक्कर, रोही, बिबट व सर्पांमुळे पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. तरीही वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे नुकसानभरपाई धोरण लागू करण्याची मागणी केली.

 

यापूर्वी गावाच्या ग्रामसभेने राज्यातील पहिला ठराव करून सर्पाला वन्यजीव घोषित करण्याची मागणी शासनापर्यंत पोहोचवली होती. इतर प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाखांची आर्थिक मदत मिळते; मात्र सर्पदंशात कोणतीच मदत मिळत नसल्याकडेही जाधव यांनी लक्ष वेधले.

 

रेस्क्यू केलेला अजगर वनविभागाकडे स्वाधीन करण्यात आला असून पुढे त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. पुढील काळात वन्यजीवांची हालचाल वाढू नये यासाठी वनविभागाने परिसरावर सातत्याने लक्ष ठेवावे, अशी मागणी जाधव यांनी केली. घटनेनंतर अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या