भुकेचा केंद्रबिंदू’ गझलसंग्रहाला राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कार

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
गझलकार गजानन वाघमारे यांचा गौरव
वाङ्मय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या नागपूरस्थित साहित्य विहार संस्थेच्या २०२४–२५ या वर्षातील राज्यस्तरीय मराठी वाङ्मय पुरस्कारांचे वितरण काल भव्य समारंभात संपन्न झाले. यवतमाळ जिल्ह्यातील महागावचे सुप्रसिद्ध गझलकार गजानन वाघमारे यांचा ‘भुकेचा केंद्रबिंदू’ हा गझलसंग्रह सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह म्हणून निवडण्यात आला. रोख पारितोषिक, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असा या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, चिन्मय मिशनचे अध्यक्ष सुनिल व्यवहारे आणि साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्षा आशाताई पांडे मंचावर विराजमान होते. ‘भुकेचा केंद्रबिंदू’ हा गझलसंग्रह ११ एप्रिल २०२५ रोजी महागाव येथे गझलनवाज पं. भीमराव पांचाळे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. प्रकाशनानंतर केवळ सात महिन्यांच्या अल्पावधीत या संग्रहाने राज्यस्तरावर तीन महत्त्वपूर्ण पुरस्कार पटकावले आहेत. शेगाव बुद्रुक (ता. वरोरा) येथील कवितेच्या घराचा प्रतिष्ठेचा बापूरावजी पेटकर राज्यस्तरीय गझलसंग्रह पुरस्कार ४ ऑक्टोबर २०२५ रोजी गझल संग्रहास प्रदान करण्यात आला. त्यानंतर हिमायतनगर येथील संवेदना फाउंडेशन आणि महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज यांचा संवेदना साहित्यरत्न पुरस्कार या संग्रहाने पटकावला. आणि आता साहित्य विहार संस्थेचा सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय गझलसंग्रह पुरस्कार भुकेचा केंद्रबिंदू या गझलसंग्रहास मिळाला. राज्यातील विविध साहित्यप्रकारांतील लेखकांना गौरविणाऱ्या साहित्य विहार संस्थेकडे यावर्षी राज्यभरातून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने साहित्यिकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. विविध शाखांमध्ये एकूण ४६ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मराठी गझल या प्रकारात ‘भुकेचा केंद्रबिंदू’ हा संग्रह अव्वल ठरला. नागपूरमधील बाबुराव धनवटे सभागृहात झालेल्या या सोहळ्यात गझलकार वाघमारे यांनी आपल्या गझलसंग्रहाबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यांनी सादर केलेल्या गझलांना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. ही उपलब्धी गझलकार वाघमारे यांच्या साहित्यिक वाटचालीतील आणखी मैलाचा दगड ठरली आहे.
