काळ्या फिती बांधून पटवारी संघाचे तीव्र धरणे आंदोलन; जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या निलंबनाचा जाहीर निषेध

 लोकवेध न्यूज नेटवर्क / २३ जून.

 

 महागाव :- 

 

महागाव तालुक्यातील उमरखेड उपविभाग शाखेच्या वतीने विदर्भ पटवारी संघ, नागपूर जिल्हा शाखा यवतमाळच्या नेतृत्वाखाली सोमवारी काळ्या फिती बांधून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करत तसेच पटवारी संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या दडपशाही धोरणाविरोधात आणि पटवारी संवर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नेर तालुक्यातील चार ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत उमरखेड उपविभागातील सर्व पटवारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यासह चार पटवार्‍यांचे निलंबन तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नेर तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, रखडलेले वेतन तातडीने अदा करावे आणि ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

आंदोलनाचे आयोजन विदर्भ पटवारी संघाचे आद्य संस्थापक कै. मारोतरावजी यदू आणि संघर्षी महर्षी कै. वि. म. उजवणे यांच्या प्रेरणेने तसेच केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संघटनेचे अध्यक्ष राजकुमार गडदे यांनी सांगितले की, “जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांनी नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठविला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई हा संपूर्ण पटवारी संवर्गाचा अपमान आहे. निलंबन मागे घेऊन रखडलेले वेतन न दिल्यास संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे कामबंद आंदोलन छेडण्यात येईल.”

या आंदोलनात विदर्भ पटवारी संघ, नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ अंतर्गत महागाव (उपविभाग शाखा उमरखेड) येथील पदाधिकारी तसेच महिला व पुरुष ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी काळ्या फिती बांधून जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाध्यक्ष भरत पिसे व इतर सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या