तीन दिवसांपासून एजी पंप अंधारात; गुंज सबस्टेशनच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी संतप्त, आंदोलनाचा इशारा

लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ मार्च
महागाव :-
गुंज सबस्टेशनवरून एजी पंपाचा वीज पुरवठा मागील तीन दिवसांपासून खंडित असल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अधीक्षक अभियंता, यवतमाळ यांच्या आदेशानुसार रविवार दिनांक १५ मार्च २०२६ पासून एजी पंपावरील रात्रीचा सिंगल फेज विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गुंज ते धनोडा-पोहंडूळ या फिडरवरील वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
या सिंगल फेज लाईनवर अनेक छोटे व्यवसाय अवलंबून असून त्यामध्ये हॉटेल, दुकाने, मोटरसायकल दुरुस्ती, हेअर सलून, कापड दुकाने यांचा समावेश आहे. रात्री वीज नसल्यामुळे व्यवसाय ठप्प झाले असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच अंधाराचा फायदा घेत जंगली जनावरे शेतात येऊन नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
दरम्यान,अनेक लाईनमेन पुसद येथून ये-जा करत असल्याने ते मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे शिरपूर येथे वीज पुरवठा खंडित झाल्यास धनोडा ते पोहंडूळपर्यंतचा संपूर्ण फिडर बंद राहतो. मागील दोन वर्षांपासून उपकार्यकारी अभियंता पद प्रभारावर असल्याने वीज वितरण व्यवस्थेत शिस्त राहिलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२६ पासूनच एजी पंपाचा वीज पुरवठा खंडित असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिकांना पाण्याचा तुटवडा भासत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे. वसुलीसाठी अधिकारी तत्पर असताना वीज पुरवठा सुरळीत देण्यात मात्र उदासीनता का, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत.
खडका येथील सोलार प्लांट सुरू झाल्यानंतर एजी पंपाला अखंडित वीज मिळणे अपेक्षित होते. मात्र धनोडा, काळीदौलतखान व सवना या तीन फिडरवर अतिरिक्त भार टाकल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार आहे.गुंज सबस्टेशन सुरळीत असतानाही शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरत असल्याची भावना व्यक्त करत, लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. पंजाबराव खडकेकर यांनी दिला आहे.
