मोटारसायकल व पाण्याच्या मोटार पंप चोरट्यांचा पर्दाफाश यवतमाळ,नांदेडमध्ये १२ गुन्ह्यांची उकल; ५ चोरटे गजाआड, ५.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :-

यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातून मोटारसायकल तसेच शेतातील पाण्याचे मोटार पंप चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी पर्दाफाश करत पाच चोरट्यांना अटक केली असून एकूण १२ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. आरोपींकडून १३ मोटारसायकल तसेच विविध कंपन्यांचे मोटार पंप, सौरऊर्जा संच, पाइप व इतर साहित्य असा एकूण ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याच अनुषंगाने दिनांक २ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली.अमोना धरणाजवळील रेस्ट हाऊस परिसरात सापळा रचून साजिद खान वाजिद खान, शेख उमेर शेख मुजीब, मोहम्मद रेहान मोहम्मद रफिक (सर्व रा. उमरखेड) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी श्रीकांत ऊर्फ शेरा बालाजी सूर्यवंशी (रा. माळसावरगाव, ता. हदगाव, जि. नांदेड) व एका विधीसंघर्षीत बालकाच्या मदतीने यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून मोटारसायकल व शेतातील मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच चोरीचा मुद्देमाल हदगाव (जि. नांदेड) येथील भंगार व्यावसायिक शेख कादीर शेख ख्वाजा यास विक्री केल्याचेही उघड झाले. आरोपींकडून लपवून ठेवलेल्या १३ मोटारसायकल, विविध कंपन्यांचे ७.५ एचपी, ५ एचपी, ३ एचपी क्षमतेचे मोटार पंप, सौरऊर्जा संच, केबल, पाइप व स्प्रिंकलर तोट्या असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईत उमरखेड, महागाव, दराटी, वणी व हदगाव पोलीस ठाण्यांतील एकूण १२ चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक  अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतीश चवरे (स्थानीय गुन्हे शाखा) व उमरखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या