हिवरा संगम येथे अपघाताची मालिका सुरूच, रेती टिपर आणि मोटारसायलमध्ये आमनेसामने धडक,एक ठार एक गंभीर जखमी आंबोडा गावावर शोककळा

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
हिवरा (संगम) येथील राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा भीषण अपघाताने रक्ताने माखला आहे. या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र आहे.आज शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास रेतीने भरलेल्या टिपर आणि दुचाकीचा आमनेसामने भीषण अपघात झाला.
या अपघातात देवानंद दोडके यांचा जागीच मृत्यू झाला असून शुभम पाटे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शुभम पाटे यांना तात्काळ सवना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुभम पाटे आणि देवानंद दोडके हे दुचाकी क्रमांक एम.एम. २९ सी एफ ८७९९ वरून प्रवास करीत असताना हा अपघात घडला.
सदर अपघातात सामील असलेला रेती वाहतूक करणारा टिपर क्रमांक एम.एच. ४० बी एल ९५४४ हा ओव्हरलोड असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताच्या वेळी या टिपरचा आरटीओ विभागाकडून पाठलाग सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.आरटीओकडून पाठलाग सुरू असतानाही असा भीषण अपघात घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, याच हिवरा (संगम) परिसरात दिनांक २९ जानेवारी रोजी ट्रक व दुचाकीच्या धडकेत करण कुमार पुंजाजी भागवत या तरुणाचा मृत्यू झाला होता.त्या घटनेनंतरही राष्ट्रीय महामार्ग विभाग,आरटीओ आणि वाहतूक वाहतूक पोलिसांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निष्पाप जीव गेले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
या राष्ट्रीय महामार्गावर स्टॉप फलक, वळण सूचक फलक, गतीमर्यादा दर्शविणारे बोर्ड, गतिरोधक तसेच रात्रीसाठी आवश्यक प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यातच ओव्हरलोड रेती वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रत्येक अपघातानंतर पंचनामे आणि चौकशीचे औपचारिक सोपस्कार पूर्ण केले जातात, मात्र अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. हा महामार्ग विकासासाठी आहे की सामान्य नागरिकांच्या जीवावर उठलेला मृत्यूचा सापळा आहे, असा सवाल आता खुलेपणाने विचारला जात आहे.
हिवरा (संगम) आणि अंबोडा परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी तात्काळ सुरक्षेच्या उपाययोजना राबवाव्यात, ओव्हरलोड रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करावी आणि वाहनांची तपासणी मोहीम राबवावी, अशी ठाम मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
