शेतकऱ्यांची लूट महागात चढ्या दराने खतविक्री करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना रद्द; कृषी केंद्र संचालकांचे धाबे दणाणले 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :–

महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथील एका कृषी केंद्र चालकाने शेतकऱ्यांना रासायनिक खत चढ्या दराने विकून थेट लूट केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने कडक पाऊल उचलत संबंधित कृषी केंद्राचा दिनांक २ फेब्रुवारी रोजी सोमवारी परवाना निलंबित केला आहे. या कारवाईने तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.

काळी (दौ.) येथील मे. सलीम अ‍ॅग्रो सेंटर विरोधात शेतकरी राहुल राठोड यांनी केलेल्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या दक्षता पथकाने अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान रासायनिक खतांची कमाल विक्री किंमत (एमआरपी) डावलून सर्रास जादा दराने विक्री केल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीत केंद्राकडे खतांच्या खरेदी बिल्लांचा अभाव, साठा रजिस्टर व प्रत्यक्ष उपलब्ध साठ्यात मोठी तफावत, तसेच पास मशीनमधील नोंदी व प्रत्यक्ष साठा यांची जुळवाजुळव न होणे असे गंभीर प्रकार समोर आले.अनेक विक्री बिल्लांमध्ये शेतकऱ्यांचे नाव, सही,वजन, लॉट क्रमांक व व्यापाऱ्याची माहितीच नसल्याचेही आढळून आले.

अनुदानित रासायनिक खतांची विक्री नियमाप्रमाणे पास मशीनद्वारे न करता थेट केली जात असल्याचे, तसेच दरमहा सादर करावयाचा विक्री अहवाल संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडे सादर न केल्याचेही तपासणीत उघड झाले.कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) व तालुका कृषी अधिकारी यांच्या तपासणी अहवालांतील त्रुटी आणि सुनावणीदरम्यान केंद्र चालकाने दिलेला खुलासा असमाधानकारक ठरल्याने अखेर कृषी विभागाने परवाना निलंबनाचा कठोर आदेश दिला.

या कारवाईमुळे तालुक्यात चढ्या दराने रासायनिक खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.असून चढ्या दराने कृषी साहित्य विक्री,रेट बोर्ड व इतर तपासण्यासाठी महागाव तालुका कृषी विभागाने तपासणी मोहीम सुरू करावी अशी जनभावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या