शिवाईE बसमध्ये दिव्यांगांना तिकीट सवलत नाकारली; शासन निर्णयांची खुलेआम पायमल्ली मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांकडे निवेदन; न्यायालयीन कारवाईचा इशारा

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
यवतमाळ :-
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्याय व समान संधी मिळाव्यात, या उद्देशाने सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये तिकीट सवलत देण्याबाबत स्पष्ट शासन निर्णय जारी केलेले असताना, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या शिवाईE (इलेक्ट्रिक) बस सेवेमध्ये दिव्यांग प्रवाशांना ही सवलत नाकारली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
शासन निर्णय क्र. अपंग-१०९८/प्र.क्र. ४२/परिवहन-४ (दि. ०३ जून १९९८) तसेच त्यानंतरच्या सुधारित निर्णयांनुसार महामंडळाच्या सर्व बस सेवांमध्ये दिव्यांग प्रवाशांना तिकीट सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र शिवाईE (इलेक्ट्रिक) बस सेवेमध्ये ही सवलत लागू न केल्याने दिव्यांग प्रवाशांवर आर्थिक बोजा पडत असून त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ही बाब केवळ प्रशासकीय दुर्लक्षाची नसून, ती शासन निर्णयांचे थेट उल्लंघन तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६च्या तरतुदींना छेद देणारी असल्याचा आरोप लखन लोंढे यांनी केला आहे. महामंडळाच्या इतर सेवांमध्ये सवलत देऊन इलेक्ट्रिक बस सेवेमध्ये ती नाकारणे हे भेदभावपूर्ण व मनमानी धोरणाचे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी लखन लोंढे यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री तसेच महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून शिवाईE बस सेवेमध्ये त्वरित सवलत लागू करण्याची ठाम मागणी केली आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास न्यायालयीन व कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एकीकडे शासन ‘समावेशक विकास’ आणि ‘समान हक्क’ यांचा पुरस्कार करत असताना, दुसरीकडे आधुनिक म्हणून गौरविल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस सेवेतच दिव्यांग प्रवाशांना सवलतींपासून वंचित ठेवणे हे संवेदनहीन प्रशासनाचे विदारक वास्तव असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
—————————————————————————————
शिवाई E बस सेवा आधुनिक असली तरी दिव्यांगांविषयीचे धोरण मागास आहे. शासन निर्णय सर्वांसाठी समान असले पाहिजेत.
लखन लोंढे,सामाजिक कार्यकर्ता, ता. महागाव, जि.यवतमाळ.
