जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिरपुली येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव:- 

दि. ७ जानेवारी २०२६ बुधवार

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, शिरपुली येथे आज केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील उबाळे,फुलसावंगी केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख राजेंद्र दुधे सर, शिक्षणप्रेमी व समाजसेवक सचिन उबाळे, प्रल्हाद भवरे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच तंत्रस्नेही शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेच्या पहिल्या सत्राची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर केंद्रप्रमुख राजेंद्र दुधे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षणातील गुणवत्ता वृद्धी, नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

या शिक्षण परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक महेश कुमार बाजपेई सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील उबाळे व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच समाजकार्यांत सदैव अग्रेसर असणारे सचिन पाटील उबाळे व प्रल्हाद भवरे यांचेही सहकार्य लाभले.

परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी खान ॲकॅडमीचे नोंदणीकरण (रजिस्ट्रेशन) करून घेण्यात आले, तसेच शैक्षणिक साहित्य निर्मिती व त्याचा वर्गखोलीतील प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभुते सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद कांबळे सर यांनी केले. ही शिक्षण परिषद शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरली असून शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या