केवायसी गोंधळामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेपासून हजारो महिला वंचित !  मुदतवाढ न दिल्यास जनआंदोलनाचा इशारा

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

महागाव:- 

राज्य शासनाच्या गाजलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणा व अपुऱ्या नियोजनाचा मोठा फटका बसत असून, जिल्ह्यातील हजारो पात्र महिला थेट लाभापासून वंचित राहिल्या आहेत. आवश्यक असलेल्या ग्राहक ओळख व पडताळणी (KYC) प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन, अपुरी माहिती व वेळेअभावी कागदपत्रे पूर्ण न झाल्याने अनेक महिलांना आर्थिक मदत मिळू शकलेली नाही.

या,अन्यायाविरोधात जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी तहसीलदार अभय मस्के यांना निवेदन सादर करून प्रशासनाला जाब विचारला.योजना महिलांसाठी आहे की कागदपत्रांसाठी ? असा थेट सवाल करत, ढिसाळ कारभारामुळे गरीब,कष्टकरी,ग्रामीण व विधवा महिलांवर अन्याय होत असल्याचा त्यांनी आपल्या निवेदनातून आरोप केला.

ग्रामीण भागात इंटरनेट सुविधांची कमतरता, सेवा केंद्रांवरील प्रचंड गर्दी, आधार-पॅन जोडणीतील तांत्रिक अडथळे आणि अपुरी माहिती यामुळे केवायसी, वेळेत पूर्ण होऊ शकली नाही.विशेषतः ३० व ३१ डिसेंबर रोजी मोबाईलवर ओटीपी न येणे व सर्व्हर काम न करणे यामुळे अनेक महिलांचे अर्ज रखडले.हे वास्तव माहिती असूनही या संदर्भात शासनाने कोणतीही मुदतवाढ न दिल्याने महिलांचे हक्क हिरावले जात असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

लाडकी बहीण योजना कागदांच्या अडचणीत अडकवून निष्प्रभ केली जात आहे.तात्काळ केवायसी, प्रक्रियेस मुदतवाढ देऊन वंचित महिलांना पुन्हा संधी द्यावी.अन्यथा, समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जगदीश नरवाडे यांनी दिला.दरम्यान, तहसीलदार अभय मस्के यांनी निवेदन स्वीकारून मुंबई येथील हेड कार्यालयातील प्रमुख जाधव यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत लवकरच मार्ग निघेल,असे आश्वासन दिले.मात्र जोपर्यंत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाही,तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,अशी ठाम भूमिका जन आंदोलन आधार संघर्ष समितीने जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या