आमनी येथील टी. जी. देशमुख आश्रम शाळेत आनंद मेळावा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांतून उद्योजकतेचे बीज रोवणारा उपक्रम

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव:- 

 

नूतन वर्षाचे स्वागत करत विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आमणी येथील टी. जी. देशमुख माध्यमिक आश्रम शाळा येथे स्काऊट गाईड पथकाच्या वतीने भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवले नाही, तर व्यवहारज्ञान व उद्योजकतेचे महत्त्वाचे धडेही प्रत्यक्ष कृतीतून आत्मसात केले.

या आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रियदर्शनी शिक्षण संस्था यांच्या सचिव श्रीमती वनमालाताई राठोड व कोषाध्यक्ष तथा माजी सभापती सुनीलभाऊ राठोड यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी श्रीमती राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे विशेष कौतुक केले, तर सुनीलभाऊ राठोड यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला.

 

दरम्यान शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे छोटेखानी स्टॉल्स उभारले होते. घरगुती चव, पौष्टिकता आणि आकर्षक मांडणी यामुळे हे स्टॉल्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेतील विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी या पदार्थांचा आस्वाद घेत मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, संवादकौशल्य व आर्थिक शिस्त विकसित होण्यास मोठी मदत झाली.

या कार्यक्रमाला माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार वानखेडे सर, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कावडे सर,रुपेश देशमुख सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा ,आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.स्काऊट गाईड पथकाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमाची परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या