मातोश्री विद्यालय, महागाव येथे कायदे विषयक ज्ञानदान शिबिर यशस्वी

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :—

मातोश्री विद्यालय, महागाव येथे तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ जानेवारी रोजी कायदे विषयक ज्ञानदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जाणीव, सामाजिक जबाबदारी आणि संविधानिक मूल्यांची ओळख निर्माण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश मा. एस. आर. जैन हे प्रमुख अतिथी व मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी तालुका वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. सुरेश राऊत, सहायक अधीक्षक एस. एस. तळेगावकर, लिपिक मो. अझीम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्य अनुताई गावंडे होत्या.

आपल्या मार्गदर्शनात मा. न्यायाधीश एस. आर. जैन यांनी शाळेचा स्वच्छ व सुंदर परिसर तसेच विद्यार्थ्यांची शिस्त याबद्दल विशेष कौतुक केले. त्यांनी पर्यावरण संतुलन, प्रदूषणमुक्त जीवन, स्त्री सुरक्षा तसेच सामाजिक आपुलकी या विषयांवर विद्यार्थ्यांना सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले. संविधानातील मूलभूत कर्तव्ये केवळ माहित असणे नव्हे तर त्यांचे आचरण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. समाजात स्वच्छ व प्रदूषणमुक्त जीवनशैली निर्माण होण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. के. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ए. एल. जाधव यांनी मानले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जाणीव वाढीस लागून सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या