नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर यांच्या पाठपुराव्याला यश; महागावमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे थकीत अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 महागाव :

महागाव शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या थकीत अनुदानाचा अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ही माहिती महागाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनंदा दिलीपराव कोपरकर यांनी दिली.

महागाव नगरपंचायतीमार्फत सन २०१७–१८ पासून प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महागाव शहरासाठी एकूण तीन डीपीआर मंजूर झाले असून, पहिल्या डीपीआरमध्ये २७५, दुसऱ्या डीपीआरमध्ये ४०१ तर तिसऱ्या डीपीआरमध्ये १८० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड नगरपंचायतीच्या माध्यमातून, कंत्राटदार सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य व केंद्र शासनाच्या मंजुरीने करण्यात आली होती.

मात्र, शासनाकडून निधी वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानापासून वंचित राहिले होते. काही लाभार्थ्यांनी तर उसनवारी करून आपल्या घरांचे बांधकाम पूर्ण केले होते. या पार्श्वभूमीवर महागाव नगरपंचायतीने सातत्याने राज्य व केंद्र शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश येत महागाव नगरपंचायतीला २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हा संपूर्ण निधी नियमाप्रमाणे घरकुल बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत साडे तीनशेहून अधिक लाभार्थ्यांनी आपले घरकुल बांधकाम पूर्ण केले आहे. या सर्व लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच समान व न्याय्य पद्धतीने निधीचे वाटप करण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर यांनी स्पष्ट केले.

महागाव नगरपंचायतीच्या पाठपुराव्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटी, पत्रव्यवहार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा निधी मिळाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, महागाव नगरपंचायतीचा एकही पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही सत्ताधारी गटाने दिली आहे. उपनगराध्यक्ष प्रमोद रामराव भरवाडे यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्यास तात्काळ लोकप्रतिनिधी, मुख्याधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले असून, अशा तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

याशिवाय, पात्र नागरिकांनी व लाभार्थ्यांनी नगरपंचायतीकडील थकीत करवसुली नियमित करावी, असे आवाहन नगरसेवक महेश गजानन पाटील यांनी केले आहे.

लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची संपूर्ण प्रक्रिया मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल नितीन हरीमकर, अभियंता तोवर तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतील निधी वितरणाचा हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने महागाव शहरातील शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून योजना प्रभावीपणे मार्गी लागल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या